Kolhapur: कागलचा सीमा तपासणी नाका शेतकऱ्यांनी पाडला बंद, पावती केल्याविना वाहने सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:59 IST2024-12-28T12:59:31+5:302024-12-28T12:59:54+5:30
कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड ...

Kolhapur: कागलचा सीमा तपासणी नाका शेतकऱ्यांनी पाडला बंद, पावती केल्याविना वाहने सोडली
कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड तास नाका बंद पाडला. शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तपासणी नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
कागलचे पोलीस निरीक्षक अजय लोहार यांनी हस्तक्षेप करीत व्यवस्थापन व शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संजय गोनुगडे, महेश घाटगे, योगेश गाताडे आदी सहभागी झाले होते. व्यवस्थापनातर्फे श्रीरॉय आणि निलेश भोसले यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आंदोलकांनी श्री रॉय यांना धारेवर धरल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. बराच वेळ नाक्यावर वाहने उभी करावी लागल्याने चालकांचाही संयम सुटला होता. त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर कोणतीही पावती केल्याविना ही वाहने सोडण्यात येत होती.
शेतकऱ्यांच्या मागण्या
कंपनीने नाका सुरू करण्यापूर्वी येथे ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे मान्य केले होते. मात्र फक्त तिघांना नोकरी दिली आहे. अजून बारा जणांना नोकरी देणे बाकी आहे. काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही देण्यात आलेली नाही. या ठिकाणी असणारे दुकान गाळेही शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे. पण कंपनीमुळेच हा विषय आता न्यायप्रविष्ट झाला आहे. उर्वरित शेतामध्ये जाण्यासाठी वाटेचाही प्रश्न सोडविण्यात आलेला नाही.