Kolhapur: 'महावितरण'चा कार्यकारी अभियंता ३० हजाराची लाच घेताना अटकेत, त्रस्त मंडळींनी केली फटाक्यांची आतषबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:22 IST2025-05-14T16:21:44+5:302025-05-14T16:22:05+5:30

सदनिकेला वीज जोडणी देण्यासाठी मागितली लाच

Executive engineer of Mahavitaran arrested while taking bribe of 30 thousand in Ichalkaranji, aggrieved people burst firecrackers | Kolhapur: 'महावितरण'चा कार्यकारी अभियंता ३० हजाराची लाच घेताना अटकेत, त्रस्त मंडळींनी केली फटाक्यांची आतषबाजी 

Kolhapur: 'महावितरण'चा कार्यकारी अभियंता ३० हजाराची लाच घेताना अटकेत, त्रस्त मंडळींनी केली फटाक्यांची आतषबाजी 

इचलकरंजी : एका इमारतीमधील १८ सदनिकांना वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंद राठी (वय ४९, रा. उपकार रेसिडेन्सी, सांगली रोड. मूळ गाव अमरावती) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

ही कारवाई मंगळवारी दुपारी महावितरणच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली. राठी सापडल्याचे समजताच काही त्रस्त मंडळींनी प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. दरम्यान, या कारवाईमुळे रक्तदाब वाढल्याने राठी याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा इलेक्ट्रिक ठेकेदार असून, त्याने एका इमारतीमधील १८ सदनिकांमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रे देऊन महावितरणकडे मागणी नोंदवली. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार याने कार्यकारी अभियंता राठी याची भेट घेतली. त्यावेळी १८ सदनिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ९० हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल, असे सांगत राठी याने लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये राठी याने ९० हजार रुपयांच्या मागणीला दुजोरा देत तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचत मंगळवारी दुपारी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राठी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठी याचा रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल

दरम्यान, कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी याचा रक्तदाब वाढल्याने त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक त्रास जाणवू लागल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तेथून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.

यापूर्वीही पाचवेळा कारवाई

महावितरणमध्ये यापूर्वीही सुमारे पाचवेळा लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. अधिकारी, कर्मचारी, सरकारी ठेकेदार अशा सहाजणांना ताब्यात घेतले. तरीही महावितरणमधील भ्रष्ट कारभार सुरूच असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले.

घरांची झडती

राठी याच्यावर कारवाई केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या अमरावती आणि इचलकरंजीतील दोन्ही घरांची झडती घेतली.

यांनी केली कारवाई

पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशिद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुऱ्हाडे, प्रशांत दावणे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Executive engineer of Mahavitaran arrested while taking bribe of 30 thousand in Ichalkaranji, aggrieved people burst firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.