Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:40 IST2026-01-03T13:40:05+5:302026-01-03T13:40:47+5:30
फरास-रमेश पोवार यांच्यात रस्सीखेच

Kolhapur Municipal Election 2026: अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणी बऱ्याच घोळानंतर प्रभाग क्रमांक १२ क मधून शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार या दोन्ही पक्षांनी पुरस्कृत केले. या दोन्ही पक्षांतील बेबनाव, एकेका जागेसाठीची रस्सीखेच आणि फरास-पोवार या उमेदवारांच्या पातळीवरील जाणीवपूर्वक समन्वयाचा अभाव त्यासाठी कारणीभूत ठरला.
तिथे क मधून वैष्णवी वैभव जाधव यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्याचा दावा केला आहे, तर शिंदेसेनेने अमृता सुशांत पोवार यांना पुरस्कृत केले असल्याचे त्या पक्षाकडून सांगण्यात आले. एकच मतदारसंघ आणि एकाच महायुतीचे दोन उमेदवार असे चित्र तिथे पुढे आले.
घडले ते असे : या प्रभागातील प्रत्येकी दोन जागा राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या वाट्याला आल्याचे नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले. त्यातील मतदारसंघ अ मधून ओबीसी प्रवर्गातून आश्किन आजरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण होते. तर ड हा खुला होता. तिथे आदिल फरास यांनी अर्ज दाखल केला. ब मधून राष्ट्रवादीकडून हसीना बाबू फरास यांनी, तर संगीता रमेश पोवार यांनीही शिंदेसेनेकडून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या चर्चेतून एकाच कुटुंबात दोन उमेदवार नकोत म्हणून हसीना फरास यांनी माघार घेण्याचे ठरले.
वाचा : इचलकरंजीत 'शिव-शाहू'च्या उमेदवारांना माघारीसाठी ४० लाखांची ऑफर; शशांक बावचकर यांचा आरोप
संगीता पोवार यांचा ब आणि क मध्ये अर्ज होता. त्यामुळे त्यांनी ब मधून माघार घ्यावी आणि क मधून निवडणूक लढवावी, असे प्रयत्न राष्ट्रवादीच्या पातळीवर झाले. परंतु त्यास पोवार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. क मधून अर्ज मागे घेऊन त्या मोकळ्या झाल्या. परिणामी महायुतीला क मध्ये उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी अगोदर ज्यांच्याशी बोलणे करून ठेवले होते त्या उमेदवारांना पुरस्कृत केले.
परिणामी, जागा एक आणि दोन उमेदवार रिंगणार राहिले. आम्हाला ३० डिसेंबरलाच आमदार राजेश क्षीरसागर यांनी ब मधून एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे आमचा तोच अर्ज कायम झाला. तेथूनच लढावे अशा आमदार क्षीरसागर यांच्या सूचना होत्या. त्यानुसारच क मधून माघार घेतल्याचे उमेेदवार संगीता पोवार यांचे पती रमेश पोवार यांनी स्पष्ट केले.