Kolhapur Election 2026: विरोधक निधी आणू शकत नाहीत हे मतदारांना पटवून द्या, महायुतीच्या नेत्यांच्या उमेदवारांना प्रचाराच्या ‘टिप्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:51 IST2026-01-02T17:51:07+5:302026-01-02T17:51:45+5:30
हुकुमशाहीमुळे राष्ट्रवादीही बाहेर

Kolhapur Election 2026: विरोधक निधी आणू शकत नाहीत हे मतदारांना पटवून द्या, महायुतीच्या नेत्यांच्या उमेदवारांना प्रचाराच्या ‘टिप्स’
कोल्हापूर : विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरे काम नाही. परंतु आपण केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रचंड कामे केली आहेत. कोल्हापूर शहरात कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत, सुरू आहेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा ही केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा. कुठेच सत्ता नसल्याने विरोधक विकासकामांसाठी निधी आणू शकत नाहीत हे सर्वसामान्य नागरिकांना पटवून द्या, अशा सूचना महायुतीच्या नेत्यांनी गुरुवारी केल्या.
महायुतीच्या ८१ उमेदवारांची एक कार्यशाळा संध्याकाळी येथील एका हॉटेलवर घेण्यात आली. त्यावेळी एकूणच प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा सर्व उमेदवारांना एकत्र करण्यात आले.
यावेळी प्रचाराचे नियोजन कसे हवे, काय बोलावे, काय बोलू नये, सोशल मीडियाचा वापर याबाबत उपस्थितांना सूचना देण्यात आल्या. विजय जाधव यांनी स्वागत केले. आदिल फरास यांनी आभार मानले. यावेळी महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम, विजय बलुगडे, समन्वय विजय सूर्यवंशी, रत्नेश शिरोळकर उपस्थित होते. समर्थ कशाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
एक मत मागणे घातक..
आता प्रभागामध्ये चौघे चौघे फिरा. महायुतीमध्ये कोणी लहान-मोठे नाही. चार ठिकाणचे चार उमेदवार आहेत. त्यामुळे तुमचे काही आधीचे मतभेद असतील तर ते लवकरात लवकर संपवा. चौघांनी तातडीने एकदिलाने प्रचाराला सुरुवात करा. कोणत्याही परिस्थितीत एक मत मागणे हे महायुतीसाठी आणि तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा, असा दमच देण्यात आला.
हुकुमशाहीमुळे राष्ट्रवादीही बाहेर
निवडणूक सुरू होण्याआधीच त्यांनी दम देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या हुकूमशाही वृत्तीमुळेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षही त्यांच्या आघाडीतून बाहेर पडला. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून ते आता सैरभैर झाले आहेत. तीन ठिकाणी पती, पत्नीला उमेदवार दिल्याने त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. भविष्यात ते जे बोलतील त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. जनसुराज्यमधील काहीजण थांबतील, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि जनसुराज्यमधील चर्चेची माहिती नाही
जनसुराज्य हा भाजपचा घटक पक्ष आहे. त्यामुळे या जागा वाटपाबाबत या दोन्ही पक्षात काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.