कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केलाय, नाना पटोलेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:15 IST2022-04-09T19:15:12+5:302022-04-09T19:15:41+5:30
कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल.

कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केलाय, नाना पटोलेंचे टीकास्त्र
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज, शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेवेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
केंद्र सरकार आरक्षण मोडीत काढत असून हे देशाला घातक आहे. कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले, भाजपला देशात समान नागरी कायदा आणण्याचा आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत असून राजर्षी शाहू महाराजांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्य माणसांमध्ये केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात चीड आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा डाव सामान्य माणसाने ओळखला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव या मोठ्या फरकाने विजयी होतील आणि कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आदी उपस्थित हाेते.
शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ
शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. भविष्यात ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोळी भाजू नका
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला भ्याड असून एसटी कर्मचारी असे करणार नाहीत. त्यांना फूस लावणारी शक्ती वेगळी असून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजण्याचा उद्योग करू नये, असे पटोले यांनी सांगितले.