Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:37 IST2026-01-10T13:36:30+5:302026-01-10T13:37:49+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपाची वाटल्यास चौकशी करा

Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ
कोल्हापूर : काळम्मावाडी येथील हवामान, पाणी उतरण्याचा कालावधी, गावागावांतून आणली गेलेली पाईपलाईन पाहता पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबविण्यात आल्याची कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीरनामा प्रकाशनावेळी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची वाटल्यास चौकशी करा. परंतु ही योजना राबविताना काही त्रुटी राहिल्या, असे ते म्हणाले.
मुश्रीफ म्हणाले, थेट पाईपलाईनच्यावेळी आम्ही सत्तेत होतो. आतासारखाच आमचा छोटा रोल होता. आम्ही वेळोवेळी काळम्मावाडी धरणावरही गेलो. परंतु मी इंजिनिअर नाही. शहरातील पाण्याच्या टाक्या व्हायला हव्या होत्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शहरातील नागरिकांना ज्या-ज्या मूलभूत सोयीसुविधा द्यायला हव्यात त्याची जबाबदारी घेतली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या भूमिपूजनावेळी तिचे भक्त असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येणार असल्याचे सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत
पन्नास खोक्यांबद्दल राज ठाकरे यांनी आराेप केले आहेत याबाबत विचारले असते चंद्रकांत पाटील म्हणाले, नुसते आरोप करून चालणार नाहीत तर त्याचे पुरावे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी ते योग्य यंत्रणेकडे दिले पाहिजेत. त्यांना मी सल्ला देण्याएवढा मोठा नाही परंतु पत्रकार परिषदेत नुसते आरोप करून काय होणार?
काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा : मुश्रीफ
मुश्रीफ म्हणाले, आमच्या विरोधकांनी जाहीरनामा जाहीर केला आहे. परंतु हा सर्व डोलारा सांभाळण्यासाठी निधी लागतो. तो निधी ते कुठून आणणार आहेत, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे परवा मी म्हणालो की, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. जनतेची फसवणूक करू नये.