Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, उद्या मुंबईत ‘वर्षा’वर बैठक; नेमकं काय घडलं..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:19 IST2025-12-27T12:58:04+5:302025-12-27T13:19:47+5:30
आमदार राहुल आवाडे यांची माहिती, कार्यकर्त्यांनी कोणताही अप्रिय निर्णय घेऊ नये

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, उद्या मुंबईत ‘वर्षा’वर बैठक; नेमकं काय घडलं..वाचा
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने तब्बल ३ टप्प्यांवरील बैठकांनंतर मुंबईतील निश्चित केलेली यादी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली. यादीमधील काही नावांबद्दल त्रुटी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेतून दोन दिवसांत संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यानंतर रविवारी (दि. २८) वर्षा निवासस्थानी बैठक होऊन फायनल यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
आमदार आवाडे यांच्यासह माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी ६५ जागांसाठी ४२९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर स्थानिक सर्व्हे आणि चर्चेतून ६० नावे निश्चित केली. त्यावर इचलकरंजी, सांगली आणि मुंबई अशा तीन टप्प्यांवर बैठका झाल्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हेनुसार आम्ही दिलेल्या नावांची चाचपणी झाली. ९० टक्के मिळतीजुळती नावेच निश्चित करण्यात आली. त्यानुसार संबंधितांना निरोप देण्यात आला.
वाचा : भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारली, महिला रस्त्यावर उतरुन लागल्या रडू
या निरोपानंतर काही जण नाराज झाले. त्यामध्ये पक्षासोबत नेहमी असणारे उमेदवारीपासून वंचित राहिले. याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांच्याशी आणि पार्टीशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तींच्या आणि यंत्रणेच्या माध्यमातून माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली आहे. ते स्वत: शहरातील उमेदवार, स्थानिक परिस्थिती याबाबत त्यांच्या यंत्रणेकडून माहिती घेतील आणि त्यानंतर फायनल यादी जाहीर करतील.
सर्वांनी एकमताने तयार केलेली अ, ब, क, ड अशी गटनिहाय संपूर्ण नावांची यादी मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चेला ठेवली जाणार आहे. त्यावर त्यांच्या यंत्रणेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा चाचपणी करून फायनल यादी जाहीर केली जाईल. पूर्ण यादीत बदल होणार नसून, काही ठराविक जागांबाबत तडजोडी होऊ शकतात, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.
महायुतीची चर्चा
राष्टवादीसोबत आमची पुन्हा चर्चा झाली नाही, तेही चर्चेला आले नाहीत. परंतु आमचे आणि शिंदेसेनेचे बोलणे सुरू आहे. शुक्रवारीही आमची बैठक झाली. त्यांच्याकडील काही जागा निश्चित करण्यात आल्या असून, उर्वरित जागांवरही लवकरच निर्णय होईल. दरम्यान, मुंबईतील बैठकीनंतर बरेचसे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी कोणताही अप्रिय निर्णय घेऊ नये
एकूण ४२९ उमेदवारांतून ६५ जागांसाठी नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे काहींना थांबावे लागेल. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्याठिकाणी उमेदवारी चुकली, तेथे फटका बसला आहे. त्यामुळे प्रत्येक जागेबाबत अतिशय जागरूकपणे चाचपणी करून उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाईगडबडीत कोणताही वेगळा अथवा चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन आवाडे यांनी केले.