Kolhapur Municipal Election 2026: आले तोंडावर मतदान.. मतांसाठी महिलांना वाण; मकर संक्रांतीआधीच भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:59 IST2026-01-12T16:58:15+5:302026-01-12T16:59:48+5:30
चिन्हाच्या आकारात वाणला मागणी, एकही कारवाई नाही...

Kolhapur Municipal Election 2026: आले तोंडावर मतदान.. मतांसाठी महिलांना वाण; मकर संक्रांतीआधीच भेटवस्तू
कोल्हापूर : तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाआधीच महापालिका क्षेत्रातील महिलांनी वाण लुटले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण असल्याने उमेदवारांना ही मोठी संधीच मिळाली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आताच उमेदवारांकडून जागोजागी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू झाले असून, त्यात विविध भेटवस्तूंचे ‘वाण’ वाटले जात आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. उमेदवार पायाली भिंगरी लावून फिरत आहेत. दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यात सणवार म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मकर संक्रांतीला हळदी कुंकू आणि एकवस्तू वाण म्हणून भेट दिली जाते. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सण आल्याने उमेदवारांनी तो कॅच न केला तर नवलच. त्यामुळे सणाआधीच भागाभागांमध्ये हळदी-कुंकू आणि वाण म्हणून भेटवस्तू दिली जात आहे. त्यामुळे सणाआधीच महिला मतदारांसाठी सण सुरू झाला आहे.
शहरात अडीच लाख महिला मतदार
शहरात २ लाख ४९ हजार ९४० महिला, तर २ लाख ४४ हजार ७३४ पुरुष मतदार आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने महिलांना साद घालण्यासाठी हळदी-कुंकूसारखा दुसरा उपक्रम नाही. मतदान १५ ला, तर संक्रांत १४ तारखेला. १४ तारखेला उमेदवारांना जाहीर कार्यक्रम करता येणार नाही, त्यामुळे सणाआधीच महिलांकडे वाण पोहोच झाले आहे.
वाणसामान, भेटवस्तू देण्याचा फंडा
वाण म्हणून उमेदवारांचे चिन्ह असलेला हळदी-कुंकवाचा करंडा किंवा त्या आकारात तयार केलेली कोणतीही एक वस्तू दिली जात आहे. यासह स्टीलचा लहान डबा, प्लास्टिकचे डबे, बाऊल, वाट्या, दिवे, शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी अशा अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या जात आहेत. यासोबत प्रचाराचे पत्रक, उमेदवाराचे चिन्ह वाटले जात आहे.
एकही कारवाई नाही...
महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी एकाही उमेदवारावर कारवाई झालेली नाही. उमेदवाराकडून केला जाणारा कोणताही उपक्रम हा आचारसंहितेच्या चौकटीत बसवला जात आहे. हळदी-कुंकूसारखा कार्यक्रम, वाढदिवसानिमित्त जेवणावळी अशा कोणत्या ना कोणत्या पळवाटांमधून मतदारांवर अमाप पैसा खर्च केला जात आहे. पण, एवढ्या ढीगभर नेमलेल्या पथकांनी कारवाई केलेली नाही.