Kolhapur Municipal Election 2026: जागावाटप ठरलं, महायुतीत नाराजीनाट्य सुरु झालं; उमेदवारी न मिळाल्याने भाजप सरचिटणीसांचा आत्मदहनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 19:23 IST2025-12-29T19:19:18+5:302025-12-29T19:23:03+5:30
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला

Kolhapur Municipal Election 2026: जागावाटप ठरलं, महायुतीत नाराजीनाट्य सुरु झालं; उमेदवारी न मिळाल्याने भाजप सरचिटणीसांचा आत्मदहनाचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा संपत आला असतानाच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर तर थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे नेत्यांपुढे नाराज उमेदवारांची समजूत काढताना दमछाक होणार आहे.
आत्मदहन इशारा देणाऱ्या धनश्री तोडकर यांनी म्हटले आहे की, मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. काही महिन्यापूर्वी माझे पती सचिन तोडकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून मी पक्षाचे काम अखंडित ठेवले. पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम मी एकटी महिला असून घेतले, पण आज माझी आर्थिक परिस्थिती नाही. या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे.
मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने मी उद्या मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११.०० वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.
वाचा : आघाडी, महायुतीचे तोरण.. ठरले बंडखोरीचे कारण; नाराजी दूर कशी करायची, नेत्यांपुढे आव्हान
दरम्यान, जागावाटपाचे निश्चित होताच महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. महायुतीतील फॉर्म्युलानुसार ८१ जागांपैकी भाजप ३६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिंदेसेना ३०, तर राष्ट्रवादी अजित पवार गट १५ जागांवर निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे.