Kolhapur: उंचावरील भागात तासभर, तर खोलगट भागात १६ तास पाणी; नियोजन नसल्यानेच पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:13 IST2026-02-21T12:12:21+5:302026-02-21T12:13:25+5:30

टँकर मुक्त कोल्हापूरचा महापौरांनी दिला नारा : उंचावरील भागात तासभर, तर खोलगट भागात १६ तास पाणी

All party corporators raised the issue of water, the first meeting of Kolhapur Municipal Corporation lasted for six hours | Kolhapur: उंचावरील भागात तासभर, तर खोलगट भागात १६ तास पाणी; नियोजन नसल्यानेच पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तेरा-तेरा वर्षांपासून पाणीपुरवठ्याला गळती आहे, उंचावरल्या भागांना एक तास अन् खोलगट भागात १६-१६ तास पाणीपुरवठा होतो. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन नसल्यानेच हे हाेत असल्याचे सांगत शुक्रवारी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य केले. सर्वच नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी एक महिन्यात कोल्हापूर टँकर मुक्त झाले पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दिलेल्या सूचना पूर्ण न झाल्यास स्वतः राजीनामा द्यायचा, असा दमही महापौर निकम यांनी भरला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी जलसंपदा विभागाच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. यावर सर्वच नगरसेवकांनी अधिकृत-अनधिकृत नळ कनेक्शन, रोज उचल व पुरवठा केले जाणारे पाणी, यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. दुर्वास कदम म्हणाले, माझ्या प्रभागात तेरा वर्षांपासून गळती आहे. मात्र, याकडे कधीही महापालिकेने लक्ष दिलेले नाही.

राजेश लाटकर म्हणाले, सानेगुरुजी वसाहत परिसरातील एका गॅरेजजवळ पाणीपुरवठ्याच्या लाइनला मोठा झरा लागला आहे. त्यावर तेथील शेती हिरवीगार झाली. अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही. जलसंपदा विभागाच्या थकबाकीवर चर्चा व्हायला हवी, मात्र येणे किती आहे, ते का येत नाही, यावरही विचारमंथन व्हावे. या प्रश्नावर विशाल शिराळे, पूर्वा राणे, सचिन शेंडे, शारंगधर देशमुख, अभिजित खतकर, ऋतुराज क्षीरसागर, विजय देसाई यांनीही मुद्दे मांडले.

रोज एक एमएलडी पाणी विनापरवाना

महापालिकेपासून शंभर मीटर अंतरावर एका इमारतीत रोज एक एमएलडी पाणी विनापरवाना वापरले जाते. मात्र, यावर कधीही कारवाई केली नाही असे सांगत लाटकर यांनी अशा चोरीच्या पाण्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

पाणीपुरवठ्याला निधीच कमी...चार महिन्यांत सगळे सुरळीत करू

गळत्या, पाणीचोरी यावर प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणीपुरवठा विभागाला निधी कमी असल्याचे सांगितले. हा निधी वाढवला तर नागरिकांना सुविधा देता येतील, असे स्पष्टीकरण दिले. येत्या चार महिन्यांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा शब्द घाटगे यांनी सभागृहाला दिला. पाणीपुरवठा विभागाकडे २६ कोटी रुपयांचे येणे असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन टँकर...त्यातील एकाचे चाक निखळले

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास महापालिकेकडे किती टँकर आहेत, अशी विचारणा सत्यजित जाधव यांनी केली. यावर प्रशासनाने २ टँकर असल्याचे उत्तर दिले. दोन टँकरवर किती जणांची तहान भागू शकेल, म्हणत जाधव यांनी उर्वरित नागरिकांनी ओढ्यातले पाणी प्यायचे का, असा सवाल केला. दोनपैकी एका टँकरचे चाक निखळल्याचाही मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.

तुम्ही निवडून आल्यावर पाणी बंद झालंय का?

आम्ही निवडून येऊन ३० दिवस झाले. त्यात १५ दिवस पाणी आलेले नाही. तुम्ही निवडून आल्यावर पाणी बंद झालंय का, असा सवाल नागरिकच आम्हाला विचारत असल्याची खंत अभिजित खतकर यांनी व्यक्त केली.

पहिलीच सभा झाली सहा तास..

तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी तब्बल सहा तास चालली. या पहिल्याच बैठकीत नूतन नगरसेवकांनी पाणी, कचरा अन् ड्रेनेजच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत समस्यांचा पाढाच वाचला. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रश्नांवर उत्तरे देताना अधिकाऱ्यांचीही काही काळ भंबेरी उडाली.

Web Title : कोल्हापुर में पानी की समस्या: खराब योजना के कारण असमान आपूर्ति

Web Summary : कोल्हापुर में पानी की आपूर्ति में असमान वितरण की समस्या है, जो कुछ क्षेत्रों में 16 घंटे तक रहती है। पार्षदों ने जल विभाग की योजना की कमी की आलोचना की। महापौर ने एक महीने के भीतर टैंकर मुक्त शहर की मांग की, और पूरा न होने पर इस्तीफे की धमकी दी।

Web Title : Kolhapur Water Woes: Uneven Supply Due to Poor Planning

Web Summary : Kolhapur faces water supply issues with uneven distribution, lasting up to 16 hours in some areas. Councilors criticized the water department's lack of planning. The mayor demanded a tanker-free city within a month, threatening resignation if unmet.