LokSabha2024: शाहू छत्रपती यांच्या भेटी, लग्नसमारंभात व्यस्त शेट्टी

By पोपट केशव पवार | Published: May 23, 2024 12:22 PM2024-05-23T12:22:05+5:302024-05-23T12:23:36+5:30

संजय मंडलिक स्पेनमध्ये : उमेदवारांना कोल्हापूरच वाटते 'भारी'

After Lok Sabha polls, Shahu Chhatrapati, Raju Shetty, Satyajit Patil Sarudkar are busy meeting people | LokSabha2024: शाहू छत्रपती यांच्या भेटी, लग्नसमारंभात व्यस्त शेट्टी

LokSabha2024: शाहू छत्रपती यांच्या भेटी, लग्नसमारंभात व्यस्त शेट्टी

पोपट पवार 

कोल्हापूर : लोकसभेचे मतदान झाल्यानंतर प्रमुख उमेदवार असलेले शाहू छत्रपती, राजू शेट्टी, सत्यजित पाटील-सरुडकर हे लोकांच्या गाठीभेटीत व्यस्त असून, प्रा. संजय मंडलिक हे स्पेन व इटलीच्या दौऱ्यावर आहेत. धैर्यशील माने हे मुंबईत प्रचारासाठी गेले होते.

लोकसभेची रणधुमाळी नुकतीच पार पडली असून, उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्तेही आता रिलॅक्स मुडमध्ये आहेत. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश उमेदवार व त्यांचे जवळचे कार्यकर्ते निवडणुकीतील थकवा दूर करण्यासाठी परदेशवारीसाठी गेले आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील बहुतांश उमेदवारांना आपला जिल्हा, शहरच अधिक प्रिय असल्याचे दिसते.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. त्याआधी उमेदवारांना जवळपास महिनाभर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना पायाला भिंगरी लावून मतदारसंघ धुंडाळावा लागला. रोजच्या पाच ते सहा सभा, दहा-पंधरा गावांना भेट, नागरिकांशी संवाद, कार्यकर्त्यांबरोबर बैठका ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी ज्येष्ठत्वाच्या वयातही मतदारसंघ धुंडाळून काढला. निवडणूक संपल्यानंतर मात्र त्यांनी कोल्हापुरातच थांबणे पसंत केले आहे. ते न्यू पॅलेसवर आलेल्या नागरिकांना भेटत असतात. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे जिल्हा बँकेच्या संचालकांसोबत स्पेन व इटली दौऱ्यावर फिरण्यासाठी गेले आहेत.

चुकलेली लग्नं अन् शेट्टी यांच्या भेटी

सतत जनतेमध्ये राहणारे नेतृत्व म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी ओळखले जातात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यंदा ते तिसऱ्या वेळी लढले. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा जनतेच्या प्रश्नांसाठी एकरूप झाले. निवडणुकीच्या काळात अनेक लग्न समारंभांना, अंत्यसंस्कारांना त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, सध्या ते त्या काळात ज्यांच्या घरी शुभमंगल झाले अशा घरी भेटी देत नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत आहेत. निवडणुकीच्या काळात ज्यांच्या घरी निधनासारखे दुर्देवी प्रसंग ओढावले, त्यांच्या घरी शेट्टी सांत्वनपर भेटी देत आहेत.

माने, सरुडकरही मतदारसंघातच

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे सध्या मतदारसंघातच आहेत. पक्षाच्या प्रचारासाठी ते तीन दिवस मुंबईत होते. याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हेही मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवित आहेत.

Web Title: After Lok Sabha polls, Shahu Chhatrapati, Raju Shetty, Satyajit Patil Sarudkar are busy meeting people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.