Kolhapur: आवाडेंशी वाद भोवला, इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचा पदाचा कार्यभार काढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:42 IST2025-02-06T12:41:36+5:302025-02-06T12:42:12+5:30

बदलीच्या विरोधात दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली. त्यामुळे बदली रद्द होऊन त्यांना कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते

Administrator and Commissioner Omprakash Divte of Ichalkaranji Municipal Corporation was removed from the post of administrator | Kolhapur: आवाडेंशी वाद भोवला, इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचा पदाचा कार्यभार काढला 

Kolhapur: आवाडेंशी वाद भोवला, इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचा पदाचा कार्यभार काढला 

इचलकरंजी : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासकपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी राज्यपालांच्या आदेशाने दिले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव ही नियुक्त केल्याचे नमूद केले असले, तरी या कारवाईच्या माध्यमातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिवटे यांना चाप लावल्याची चर्चा शहरातील राजकीय वतुर्ळात रंगली आहे.

महापालिकेत ६ जुलै २०२३ ला ओमप्रकाश दिवटे यांची आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. माजी मंत्री आवाडे आणि आयुक्त दिवटे यांच्यात वादही झाला होता. त्यानंतर दिवटे यांच्या वर्षपूर्तीला अवघे काही दिवस बाकी असताना पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. त्या बदलीच्या विरोधात दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली. त्यामुळे बदली रद्द होऊन त्यांना कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे महापालिकेचा कार्यभार कायम होता तसेच पालिकांच्या निवडणुका न झाल्याने महापौरपदाच्या अधिकाराचे प्रशासकपदही आयुक्तांकडे होते. 

मात्र, बुधवारी त्यांच्याकडून तडकाफडकी प्रशासक हे पद काढून घेण्यात आले. त्याजागी प्रशासकपदी जिल्हाधिकारी येडगे यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकपदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा आणि आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे, असेही शासन आदेशात नमूद केले आहे. या निर्णयामुळे यापुढे आयुक्त दिवटे यांना कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी लागणार आहे. राज्यातील २८ महापालिकांमध्ये आयुक्तांकडे प्रशासक पदाचा कार्यभार असून आयुक्तांकडील या पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविल्याची इचलकरंजी महापालिकेतील ही पहिलीच घटना आहे.

Web Title: Administrator and Commissioner Omprakash Divte of Ichalkaranji Municipal Corporation was removed from the post of administrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.