Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:10 IST2025-03-11T14:08:42+5:302025-03-11T14:10:59+5:30
आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली

Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी सुळकुड योजना कार्यान्वित करण्यासाठी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्याअगोदर बैठक लावून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मंगळवारी दिले. इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्या लक्षवेधीवर सभागृहामध्ये चर्चा झाली. त्यावेळी फडणवीस आणि नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी उत्तरे दिली.
इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतून येणाऱ्या पाण्यासाठी १८.६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र या जलवाहिनीस वारंवार गळती लागते. सन २०२२-२३ मध्ये सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम इलेकॉन एनर्जी या कंपनीला दिले आहे. मात्र दोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही त्यांच्यावर कारवाई करावी व त्या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी मागणी आवडे यांनी केली.
त्यावर मंत्री सामंत यांनी उत्तर देताना म्हणाले, १.९ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. संबंधित यंत्रणेला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील. तसेच सुळकुड पाणी योजने संदर्भात बैठक लावून अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यावर समाधान न झालेले आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले, त्यांनी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशन संपण्याअगोदर बैठक घेऊन असे आश्वासन दिले.