इचलकरंजीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:54 IST2025-12-30T13:52:54+5:302025-12-30T13:54:36+5:30
शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज आज, शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार

इचलकरंजीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणार
इचलकरंजी : शक्तिप्रदर्शनाने अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एका कार्यकर्त्याला निवडणूक कार्यालयात येण्यास अडविल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार शेवटचा दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी ‘टोकन’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. सोमवारी ६३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
इच्छुकांना मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सोमवारअखेर झालेल्या उमेदवारी अर्जांची विक्री लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन ‘टोकन’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. सर्वात शेवटी ३ वाजण्याच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात येणाऱ्या उमेदवाराला उलट्या क्रमाने प्रथम क्रमांकाचे ‘टोकन’ देण्यात येणार आहे. यामुळे प्रशासनाला उमेदवारांची संख्या कळणार आहे.
अनेक इच्छुक उमेदवारांनी पावत्या करण्याबरोबरच कागदपत्रांची तपासणी करून घेतली आहे. त्यामुळे काहींचा उमेदवारी अर्ज भरण्यास कमी कालावधी लागणार आहे, तर काहींना विलंब लागणार आहे. सोमवारी ६३ अर्ज दाखल झाले असून, त्यामध्ये प्रभाग समिती कार्यालय अ मध्ये १४, ब मध्ये १८, क मध्ये १३ आणि ड मध्ये १८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. आजअखेर ६५ अर्ज दाखल झाले आहेत.
शहापूर, छत्रपती शाहू पुतळा व जुन्या नगरपालिका परिसरात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. अनेकांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. जुन्या नगरपालिकेजवळ कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची झाली.
यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
प्रभाग समिती कार्यालय अ
राहुल घाट, रवींद्र माने, रूपा बुगड, मनीषा नवनाळे, रूबन आवळे, स्मिता मस्के
प्रभाग समिती कार्यालय ब
अभिषेक वाळवेकर, ओंकार सुर्वे, स्नेहल रावळ, चंद्रकांत बिरंजे, अभिषेक सारडा, सुरेखा जाधव, गणेश गळंगी
प्रभाग समिती कार्यालय क
अलका स्वामी, विजयालक्ष्मी महाजन, सुनील पाटील
प्रभाग समिती कार्यालय ड
अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, मेघा भाटले, राजू चव्हाण, तौफिक कोठीवाले, उदयसिंह पाटील, रूपाली कोकणे
शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार
शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शिवतीर्थ ते शंभूतीर्थ अशी पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर उमेदवार आपापल्या प्रभाग समिती कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होतील. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील, कराडचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, प्रदेश सचिव मदन कारंडे आदी सहभागी होणार आहेत.