कोल्हापूर जिल्ह्यात ८१५ मंडळांनी आवाज मर्यादेचे केले उल्लंघन, गणराया ॲवॉर्ड समारंभात पोलिस अधीक्षकांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:44 IST2025-09-25T12:44:23+5:302025-09-25T12:44:54+5:30
पुढील वर्षी सुधारणा करण्याचे आवाहन

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ८१५ मंडळांनी गणेशोत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याची खंत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी व्यक्त केली. कायदा सर्वांना सारखाच असल्याने दोषी मंडळांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. बुधवारी (दि. २४) सायंकाळी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या गणराया ॲवॉर्ड समारंभात त्यांनी विजेत्या मंडळांना बक्षिसांचे वितरण केले.
अधीक्षक योगेश कुमार यांनी विधायक उपक्रम राबविणा-या मंडळांचे कौतुक केले. विसर्जन मिरवणुकीत रात्री सात ते बारापर्यंत आवाज मर्यादित राहावा आणि गर्दी नियंत्रित राहावी यासाठी पुढील वर्षी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी नियमांचे पालन करून विधायक पद्धतीने पुढील वर्षी गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डांगे गल्ली तरुण मंडळ तोरस्कर चौक (प्रथम), हायकमांडो फ्रेंड्स सर्कल बुधवार पेठ (द्वितीय), जय शिवराय सांस्कृतिक क्रीडा सर्कल तरुण मंडळ लक्षतीर्थ वसाहत (तृतीय), रामानंद महाराज अवधूत मंडळ जुना शुक्रवार पेठ (विभागून तृतीय), रणझुंजार तरुण मंडळ शनिवार पेठ आणि सी वॉर्ड संयुक्त सेवा मंडळ सोमवार पेठ या मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूल गल्ली मंडळ उमा टॉकीज चौक (प्रथम), लेटेस्ट तरुण मंडळ (द्वितिय), नाथागोळे तालिम मंडळ गुलाब गल्ली (तृतीय) आणि प्रिन्स क्लब खासबाग मिरजकर तिकटी या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री गणेश पूजा मित्र मंडळ कवडे गल्ली कसबा बावडा (प्रथम), शाहूपुरी युवक मंडळ शाहूपुरी व्यापार पेठ (द्वितीय), व्हिनस तरुण मंडळ व्हिनस कॉर्नर (तृतीय) आणि भारतवीर तरुण मंडळ चौगुले गल्ली कसबा बावडा या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ सहावी गल्ली (प्रथम), जय शिवराय मित्र मंडळ शिवाजी उद्यमनगर (द्वितीय), लंबोदर तरुण मंडळ चार्ली स्पोर्ट्स क्लब तेरावी गल्ली (तृतीय), विवेकानंद मित्र मंडळ तेरावी गल्ली या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये डांगे गल्ली तरुण मंडळ तोरस्कर चौक (प्रथम), श्री गणेश पूजा मित्र मंडळ कवडे गल्ली कसबा बावडा (द्वितीय), राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ सहावी गल्ली (तृतीय), लेटेस्ट तरुण मंडळ गुलाब गल्ली (विभागून तृतीय) आणि शाहूपुरी युवक मंडळ शाहूपुरी व्यापार पेठ, जय शिवराय मित्र मंडळ शिवाजी उद्यमनगर, पूल गल्ली मंडळ उमा टाकीत चौक या मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.