Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:36 IST2025-09-05T18:35:57+5:302025-09-05T18:36:12+5:30

नव्या इच्छुकांसह जुन्यांनाही नव्याने करावी लागणार व्यूहरचना

65 members will be elected from 16 wards for Ichalkaranji Municipal Corporation | Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार

इचलकरंजी : महापालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना अखेर गुरूवारी जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केलेल्या रचनेत काही भाग जोड-तोड झाल्याने नव्या इच्छुकांसह माजी नगरसेवकांनाही नव्यानेच मतदारसंघाची बांधणी करावी लागणार आहे. शहरात १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार असून, १ ते १५ प्रभाग चार सदस्यीय, तर १६ नंबरचा प्रभाग ५ सदस्यीय आहे. या रचनेवर हरकती घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

नव्या प्रभाग रचनेनुसार, ४ वॉर्डचा १ प्रभाग असून, प्रत्येक नगरसेवक १६ हजार ५०० ते २४ हजार ५०० लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या २४ हजार ४०८ (१६ नंबर प्रभाग), तर सर्वात कमी १६ हजार ४६३ (१३ नंबर प्रभाग) आहे. तसेच अनुसूचित जातीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्र. १० (४०१८) मध्ये आहे, तर सर्वात कमी प्रभाग क्र. १३ (२७९) मध्ये आहे. तर अनुसूचित जमातीमध्ये सर्वात जास्त प्रभाग क्र. ११ (३८६), सर्वात कमी प्रभाग क्र. ६ (२७) इतकी लोकसंख्या आहे.

नव्या प्रभाग रचनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या प्रभागात काम केले आहे, त्यातील काही भाग अन्य प्रभागांत जोडला गेल्याने काहींना धक्का, तर काहींना फायदा होणार आहे. चार वॉर्डांचा एक मतदारसंघ असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा कस लागणार आहे. त्याचबरोबर अपक्षांना सर्व ठिकाणी पोहोचताना नाकीनऊ येणार आहेत.

एक दिवस उशिरा प्रसिद्धी

प्रभाग रचना बुधवारी (दि. ३) प्रसिद्ध होईल म्हणून नेत्यांसह इच्छुकांचे लक्ष लागले होते. परंतु, गुरूवारी सायंकाळी उशिरा प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यानुसार आपला वॉर्ड कसा फुटला, यावर रात्री उशिरापर्यंत चर्चा तसेच आपल्या वॉर्डात येणाऱ्या अन्य सदस्यांबरोबर भेटीगाठी सुरू होत्या. एक दिवस उशिरा प्रसिद्ध झाल्याने हरकतीसाठीही एक दिवस वाढ मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित होत होता.

महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर

महापालिकेने गुरूवारी सायंकाळी उशिरा प्रभागानुसार रचना जाहीर केली. त्याचबरोबर त्याचा नकाशा अनुसूचित जाती-जमाती यासह सविस्तर प्रसिद्ध केला आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार जाहीर झालेली प्रभाग रचना योग्य आहे. त्यानुसार भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून प्राप्त सूचनेप्रमाणे व्यूहरचना आखली जाईल. त्यातून पहिला महापौर भाजपचा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - अलका स्वामी, माजी नगराध्यक्षा

जाहीर झालेली प्रभाग रचना कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. नियमामुळे काही भाग वेगवेगळा झाला असला, तरी त्यानुसार सर्वांना आपली ताकद लावून निवडणुकीला सामोरे जावे लागेल. - प्रकाश मोरबाळे, माजी उपनगराध्यक्ष

प्रभाग रचना योग्य असून, त्या प्रभाग रचनेनुसार शिवसेना योग्य उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. वरिष्ठ स्तरावरून येणाऱ्या सूचनेप्रमाणे महायुतीचा निर्णय ठरेल. - रवींद्र माने, जिल्हाप्रमुख, शिवसेना

प्रभाग रचनेत अनेक भाग बदलले आहेत. परंतु, निर्माण झालेला प्रभाग योग्य आहे. त्यानुसार व्यूहरचना सुरू होईल. - संजय कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष

प्राथमिक माहितीप्रमाणे महाविकास आघाडीला दिलासादायक अशी वॉर्ड रचना दिसते. त्याप्रमाणे अन्य घटक पक्षांसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. - सागर चाळके, मँचेस्टर आघाडी
 

Web Title: 65 members will be elected from 16 wards for Ichalkaranji Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.