Ichalkaranji Municipal Election 2026: ईर्षा...तणाव...वादावादी; इचलकरंजीत ४५६ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:59 IST2025-12-31T17:58:40+5:302025-12-31T17:59:00+5:30
माजी आमदार, पोलिसांमध्ये वादावादी

Ichalkaranji Municipal Election 2026: ईर्षा...तणाव...वादावादी; इचलकरंजीत ४५६ उमेदवारी अर्ज दाखल
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ विक्रमी अर्ज दाखल झाले. तसेच आजतागायत एकूण ४५६ अर्ज दाखल झाले. उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रभाग समिती कार्यालयात सोडण्यावरून माजी आमदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली, तर एका उमेदवाराचा अर्ज दोन मिनिटे उशिरा आल्याने भरायचा राहून गेला. शिव-शाहू विकास आघाडीने पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल केले.
महानगरपालिकेच्या ६५ जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ इतके उमेदवारी अर्ज चार प्रभाग समिती कार्यालयांत दाखल झाले. महायुती व शिव-शाहू आघाडीतील उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
शहापूर येथील प्रभाग समिती कार्यालयात क्रांती आवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार राजीव आवळे आले होते. सूचक व अनुमोदकाला आत घेऊन जाण्यावरून आवळे व पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात जोरदार वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही पोलिसांनी आवळे यांना बाजूला घेऊन हा वाद मिटविला. तसेच शाहू पुतळ्याजवळील प्रभाग समिती कार्यालयात गर्दी झाल्याने अनेकांना गुदमरू लागले. त्यामुळे ज्यांचे काम झाले आहे, त्यांना बाहेर सोडा यासाठी जोरजोराने शटर वाजवून ते उघडण्यास भाग पाडले, या कारणावरून पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात वादावादीचा प्रकार घडला.
प्रभाग क्रमांक १६ मधून प्रीतम कोरे हे संतोष सावंत यांच्यासमवेत जुन्या नगरपालिकेतील प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. दोन मिनिटे उशिरा आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. दरवाजा बंद केल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांना आहे तसेच त्यांना परतावे लागले.
ठीक ३ वाजता प्रभाग समिती कार्यालयाचे दार बंद करण्यात आले. आतमध्ये असलेल्या सर्वांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आत असलेल्यांना बाहेर सोडण्यात आले. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काही वादाचे प्रसंग वगळता शांततेत पार पडली.