सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई की केदार दिघे? कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीत खल

By अनिकेत घमंडी | Published: March 19, 2024 08:30 AM2024-03-19T08:30:55+5:302024-03-19T08:42:59+5:30

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे असतील असे संकेत मिळत आहेत

Sushma Andhare Varun Sardesai or Kedar Dighe Kalyan in Mahavikas Aghadi for Kalyan Lok Sabha | सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई की केदार दिघे? कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीत खल

सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई की केदार दिघे? कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीत खल

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे असतील, असेच संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मुलूखमैदान तोफ सुषमा अंधारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, कट्टर शिवसैनिक बंड्या साळवी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या नावांमध्ये चर्चा सुरू आहे.

अंधारे या आक्रमक नेत्या असून, त्या उमेदवार झाल्या तर आपल्या भाषणांनी तसेच आरोपांनी त्या ही निवडणूक गाजवतील, असे ठाकरे गटाच्या मंडळींना वाटते. मतांच्या समीकरणाचा विचार करता अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, मुंब्रा, कळवा या विधानसभा मतदारसंघांमधील दलित, मागासवर्गीय मते आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश मिळेल. पण, अंधारे यांना केवळ एका लोकसभा मतदारसंघात अडकवून न ठेवता त्यांना महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी प्रचाराला पाठविण्याचा विचार उद्धव ठाकरे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक बंड्या साळवी यांना कोविड झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणला हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. साळवी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असल्याने त्यांच्याही नावाची चर्चा आहे. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले साळवी हे कल्याण पश्चिमेतून पराभूत झाले होते. साळवी हे तुलनेने शांत, संयमी असून, या ठिकाणी आक्रमक चेहऱ्याची गरज असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. शिंदे यांच्या समोर साळवी यांची उमेदवारी फारशी प्रभावी ठरणार नाही, असेही बोलले जाते. 

ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई हे आमदार आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असून, डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. ते येथे वास्तव्यास नसले तरी पेंडसेनगरमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. ते येथे उमेदवार म्हणून आल्यास शिंदे यांचे आव्हान स्वीकारून ठाकरेंच्या घरातली व्यक्ती निवडणूक लढण्यास उतरल्याचे मानले जाईल. मात्र, सरदेसाई यांचा निवडणुकीत पराभव झाल्यास तो आदित्य ठाकरे यांच्याकरिता मोठा धक्का असेल.

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे नाव चर्चेत आहे. दिघे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण लोकसभेत मतदार आहे. दिघे यांचे कट्टर समर्थक अशी ख्याती असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्रासमोर दिघे यांना उभे केल्याने आनंद दिघे यांच्या रक्ताच्या नातलगांसोबत शिंदे दोन हात करीत आहेत, असे नॅरेटिव्ह तयार करण्यात ठाकरे तयार होतील. परंतु, दिघे यांच्यामागे ठाकरे यांना आर्थिक ताकद उभी करावी लागेल.

Web Title: Sushma Andhare Varun Sardesai or Kedar Dighe Kalyan in Mahavikas Aghadi for Kalyan Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.