"शिंदेंसोबतच जायचं होतं, तर आमच्याशी युती कशाला केली?" संजय राऊत मनसे नेत्यांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:03 IST2026-01-22T11:02:42+5:302026-01-22T11:03:07+5:30
कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेसोबत झालेल्या युतीवरुन संजय राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र डागलं आहे.

"शिंदेंसोबतच जायचं होतं, तर आमच्याशी युती कशाला केली?" संजय राऊत मनसे नेत्यांवर संतापले
Sanjay Raut On KDMC Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिंदेसेनेने मनसेला सोबत घेतले. उद्धवसेनेचे चारजणही शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत. शिंदेसेना महापौरपदासाठी ६५ ची मॅजिक फिगर गाठण्याच्या तयारीत आहे. कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवारी बसने एकत्र जाऊन शिंदेसेनेने ५३, तर मनसेने ५ नगरसेवकांचा गट स्थापन केला. यानंतर युतीत सोबत असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी स्थानिक मनसे नेत्यांना सुनावलं आहे. शिंदेसेनेसोबत जायचे होते तर आमच्यासोबत युती करायची नव्हती अशा शब्दात राऊत यांनी टीका केली.
स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक निर्णय घेऊ शकतात, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो, असं स्पष्टीकरण राजू पाटील यांनी दिलं. यावर बोलताना संजय राऊत यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती असल्याने इतरांनी त्यात घुसण्याचे कारण नव्हतं असं म्हटलं.
राज ठाकरेंसोबत अंतर्गत चर्चा करु
"अशा राजकारणात नीतिमत्ता वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये जे घडले ती त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. स्वतः राज ठाकरे यांनाही ती भूमिका मान्य नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमच्या लक्षात आले. पण मनसेच्या स्थानिक नेत्यांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नव्हती पाहिजे. त्यांच्या गटाच्या बाबतीत आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे. तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. इतरांनी त्यात घुसायचे कारण नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही अंतर्गत चर्चा करु," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
'त्या' बैठकीची उद्धव ठाकरेंना माहिती होती
"शिंदे गटासोबत जाण्याच्या प्रस्तावाला आम्ही केराची टोपली दाखवतो. शिंदेंसोबत आम्ही कदापि जाणार नाही. इतर काही पर्याय असतील तर त्याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. पण परस्पर निर्णय कोणी घेणार नाही. श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्याची माहिती उद्धव ठाकरेंनाही होती. त्यांनी ही माहिती मला दिली. पहिल्या दिवासापासून याची माहिती होती. आताही पडद्यामागे काय सुरु आहे याचीही माहिती आहे. अशा प्रकारची कोणतीही युती मराठी माणूस मान्य करत नाही. शिंदेंना धडा शिकवण्यासाठी आम्हाला यश मिळालं. असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्यामुळे मराठी माणूस दुखावला जाईल," असंही संजय राऊत म्हणाले.