KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:26 IST2026-01-02T14:24:55+5:302026-01-02T14:26:24+5:30
KDMC Election Results 2026: भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
KDMC Election Results 2026: डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच भाजपाचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे महेश पाटील बिनविरोध निवडून आलेत. घरत यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेलाही धक्का बसला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न लोकांना पडला आहे. याठिकाणी भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात आधी संघर्ष होता. परंतु शेवटच्या टप्प्यात या दोन्ही पक्षांनी महायुती केली. त्यामुळे अनेक इच्छुक नाराज झाले. परंतु तरीही भाजपाचे ८ आणि शिंदेसेनेचे ४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपा उमेदवार महेश पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. मनोज घरत यांच्याशी संपर्क साधण्याचा लोकमतने प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.
भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक २७ ड मधून शिंदेसेनेतून आलेले महेश पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. याठिकाणी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत हे उमेदवार होते. या दोघांमध्ये तगडी लढत होईल असं बोलले जात होते. परंतु मतदानापूर्वीच याठिकाणचं चित्र बदलले आहे. पॅनल २७ मधील भाजपाच्या मंदा पाटील याआधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यानंतर आता महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मनोज घरत हे केवळ मनसेचे उमेदवार नव्हते तर डोंबिवली शहराची धुरा मनसेने त्यांच्या हाती दिली होती. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. डोंबिवलीत मनसेला गळती लागल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या मनसे संघटनेत फेरबदल केले होते. त्यात मनोज घरत यांच्यावर शहर अध्यक्षपद सोपवले होते. परंतु मनोज घरात यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसला. घरत यांनी उमेदवारी मागे का घेतली, विरोधी पक्षांचा त्यांच्या दबाव होता का की अंतर्गत राजकीय समझोत्यातून काय घडामोडी घडल्या आहेत याची चर्चा डोंबिवलीच्या राजकारणात सुरू झाली आहे.