"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:08 IST2026-01-15T11:00:25+5:302026-01-15T11:08:37+5:30
युतीमध्ये काही अलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले. इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.

"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
डोंबिवली: मनसे नेते राजू पाटील यांनी सहकुटुंब काटई मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मनसेचे उमेदवार योगेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना भाजप युतीवर टीका केली.
मनसे नेते राजू पाटील म्हणाले, जो आपल्या भागात अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मतदानासाठी उतरले पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही. हा केवळ युतीचा पॅटर्न आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. युतीमध्ये काही अलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले. इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.
शाई लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप -
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॅनल क्रमांक ९ मधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई चक्क लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. या प्रकारामुळे पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उर्मिला तांबे या प्रकाराबाबत माहिती मिळताच उर्मिला तांबे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "मतदानासाठी बोटाला लावलेली शाई जर लगेच पुसली जात असेल, तर हा काय प्रकार आहे? जर असेच गैरप्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या शाईचा वापर करून बोगस मतदान होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.