कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज उभे करणार उमेदवार
By प्रशांत माने | Updated: March 17, 2024 19:50 IST2024-03-17T19:50:01+5:302024-03-17T19:50:21+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला ठरावाद्वारे प्रतिसाद

कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मराठा समाज उभे करणार उमेदवार
कल्याण: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली असताना त्यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात देखील समाजाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. रविवारी कल्याण पश्चिममध्ये पार पडलेल्या बैठकीत दोन्ही मतदारसंघात प्रभाग निहाय मोठया संख्येने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
रामदासवाडी परिसरात पार पडलेल्या बैठकीला दोन्ही मतदारसंघांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही राजकीय पक्षांतील मराठा समाजातील माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी देखील मोठया संख्येने उमेदवार उभे करण्याच्या जरांगे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचीही माहीती सूत्रांनी दिली. समाजातील शाम आवारे, सुभाष गायकवाड आणि धनंजय जोगदंड यांनी पार पडलेल्या बैठकीची आणि त्यात कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोठया संख्येने उमेदवार उभे करण्याचा ठराव झाल्याची माहिती दिली. मराठा समाजातील उमेदवारांना निवडून आणण्याबाबत अन्य समाजातील बांधवांना देखील आवाहन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतू अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान मोठया संख्येने उमेदवार उभे राहील्यास ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागेल. प्रशासनाला अडचणीत आणण्याचा डाव मराठा समाजाकडून साधला जाणार असल्याची चर्चा आहे.