समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

By नितीन पंडित | Updated: January 19, 2026 09:00 IST2026-01-19T09:00:37+5:302026-01-19T09:00:37+5:30

नितीन पंडित महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले. ९० ...

infighting within the Samajwadi Party in Bhiwandi is benefiting the Congress | समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

नितीन पंडित

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले. ९० नगरसेवक जागा असलेल्या या महापालिकेत काँग्रेस ३०, भाजप २२, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, शिंदेसेना १२, समाजवादी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) करू शकतो. मात्र, याबाबत दोघांनी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. कारण, निवडणुकीत काँग्रेस आणि  राष्ट्रवादी (शरद पवार) स्वतंत्र लढले होते.

महापालिकेत काँग्रेसला जे यश मिळाले त्यामागे  भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांचा हात असल्याचे उघड आहे. समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी आणि आ.  शेख यांच्यातील वाद निवडणुकीच्या तोंडावरच उफाळला होता. आझमींनी शेख यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. सुरुवातीला शेख यांनी काँग्रेस उमेदवारांचा छुपा प्रचार केला. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी त्यांनी जाहीर प्रचारही केला.  

भिवंडी पूर्व या आपल्या मतदारसंघात आ. शेख यांनी केलेल्या विकास कामांवरच त्यांनी मते मागितली. तर, समाजवादीच्या उमेदवारांनी शेख यांचा जाहीर अपमान केल्याने मतदार नाराज होते. त्यामुळे समाजवादी पक्षाचा आमदार असलेल्या पूर्व मतदारसंघात त्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. समाजवादीचे निवडून आलेले ६ नगरसेवक भिवंडी पश्चिम मतदारसंघातील असल्याने पूर्वेत आ. शेख यांचा प्रभाव पुन्हा सिद्ध झाला आहे. समाजवादीच्या अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे बंडखोरी आणि लोकसभा व विधानसभेत झालेल्या वाताहतीनंतरही मनपा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे.

मुस्लीम बहुल मतदारांचे शहर अशी भिवंडीची ओळख आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झाला. तर, विधानसभा निवडणुकीतही पूर्वेत शिवसेना, तर पश्चिममध्ये भाजपला विजय मिळाला. तेव्हापासून शहरात काँग्रेसला उतरती कळा लागली होती. २०१७च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा उभारी घेत ९० पैकी ४७ जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता स्थापन केली होती. तरीही दगाफटका नको, म्हणून शिवसेनेशी युती करत महापौरपद आपल्याकडे, तर उपमहापौरपद शिवसेनेला दिले. त्यांनतर अडीच वर्षांतच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीत प्रवेश केला अवघे ४ नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौरपद, तर बंडखोरांना उपमहापौरपद मिळाले होते. काँग्रेसने १८ नगरसेवकांची तक्रार केल्यानंतर नगरविकास विभागाने १८ नगरसेवकांना बडतर्फ केले, मात्र तोपर्यंत मनपाचा कार्यकाळ संपला होता.  तर, ४७ पैकी १८ नगरसेवक फुटल्याने काँग्रेसकडे २९ नगरसेवक होते. या निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकत अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे.

Web Title : समाजवादी पार्टी में कलह से भिवंडी चुनाव में कांग्रेस को फायदा

Web Summary : समाजवादी पार्टी के आंतरिक कलह के कारण भिवंडी में कांग्रेस को लाभ हुआ। रईस शेख के समर्थन से कांग्रेस ने 30 सीटें जीतीं, जो सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी। इस जीत ने क्षेत्र में पिछली चुनावी असफलताओं के बाद कांग्रेस को पुनर्जीवित किया।

Web Title : Infighting in Samajwadi Party Benefits Congress in Bhiwandi Election

Web Summary : Congress gained in Bhiwandi due to Samajwadi Party's internal conflict. Rais Shaikh's support helped Congress win 30 seats, emerging as the largest party. This victory revives Congress after previous electoral setbacks in the region.