भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:20 IST2026-01-08T13:17:42+5:302026-01-08T13:20:00+5:30
बिनविरोध निवडीमागील हेतू : डोंबिवलीवर लक्ष देण्याची गरज झाली कमी...

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
अनिकेत घमंडी -
डोंबिवली : महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच डोंबिवलीत भाजपच्या १४ आणि शिंदेसेनेच्या सहा अशा २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध आले. त्यापैकी एक कल्याणची महिला उमेदवार वगळता १९ बिनविरोध उमेदवार डोंबिवलीकर आहेत. डोंबिवलीमध्ये भाजपने ३७ ठिकाणी उमेदवार दिले असून, आता २३ उमेदवार रिंगणात आहेत. डोंबिवली हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने राज्यातील महापालिकांच्या परीक्षेचा पेपर सोडवण्यापूर्वी चव्हाण यांनी डोंबिवलीचा पेपर सोपा केल्याची चर्चा आहे.
मंदार हळबे, विनोद काळण, कृष्णा पाटील यांची पत्नी, अभिजित थरवळ तसेच पॅनल २८ मध्ये शिंदेसेनेचे सूरज मराठे, असे एक, दोन उमेदवार निवडून येणे बाकी आहे. त्या उमेदवारांसमोर उद्धवसेना, मनसे, अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याने भाजप, शिंदेसेनेचे वरिष्ठ नेते शहरात प्रचाराला येणार नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी प्रचाराच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी फार कमी प्रमाणात झाडल्या जातील असे बोलले जात आहे. प्रचाराला दिवसही कमी असल्याने नेत्यांची धावपळ आहे.
कल्याणात भाजपची १७ जणांना उमेदवारी
भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या ५४ पैकी ३७ जागांवर डोंबिवली परिसरात उमेदवारी दिली. कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीणमध्ये भागात १७ जणांना उमेदवारी दिली होती. कल्याण पूर्वेमध्ये आणखी काहींना उमेदवारीची अपेक्षा होती. त्यामुळे तेथे काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती; पण अखेर आ. सुलभा गायकवाड यांनी त्या ठिकाणी समजूत काढल्याने काही प्रमाणात रोष मावळला. डोंबिवलीच्या तुलनेत कल्याणमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध येऊ शकले नाही. साहजिकच कल्याणमध्ये भाजपला मेहनत करावी लागेल.
फडणवीस यांची डोंबिवलीत सभाच नाही
डोंबिवलीकर मतदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची प्रतीक्षा असते; परंतु विधानसभा आणि आता मनपा निवडणुकीमध्ये ते प्रचाराला शहरात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण पूर्वमध्ये ते येऊन गेले. आता याठिकाणी सभा होणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी सभा घेतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.