डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:07 IST2026-01-14T19:07:23+5:302026-01-14T19:07:37+5:30
भाजपा-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली त्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढत असले तरी या दोन्ही पक्षांमधील छुपा संघर्ष सुरू आहेत. डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांविरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या उमेदवारांनी केला होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. याच कारणावरून भाजपा आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले ज्यांच्यावर मानपाड्यातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर कल्याण ग्रामीणचे शिंदेसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी म्हटलं की, या घटनेबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी. यातील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील. नितीन पाटील यांनी रंगेहाथ पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. इथे दहशतीचं वातावरण आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. बाहेरचे लोक इथे येता कामा नये असं त्यांनी सांगितले.
तर एका सोसायटीच्या कार्यक्रमात आमचे कार्यकर्ते गेले होते. तिथे नितीन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने कार्यकर्त्याच्या खिशात पैसे घातले आणि व्हिडिओ बनवला. ते मुरब्बी राजकारणी आहेत. ओमनाथ लाटेकर जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला आहे. हा पैसा वाटपाचा विषय नाही. कार्यक्रमाला आमच्या उमेदवारांना बोलावले पण त्यांना बोलावले नाही हा राग त्यांच्या मनात होता. तो त्यांनी व्यक्त केला. मी रवींद्र चव्हाण यांच्याशी बोललो. त्यांनी वाद करू नका असं सांगितल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटलं.
दरम्यान, भाजपा-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली त्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यातील जखमींवर मानपाड्याच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या तपास सुरू आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.