राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:22 IST2025-12-25T12:11:43+5:302025-12-25T12:22:13+5:30
युती ठरली : शिंदेसेनेचा सन्मानजनक जागांसाठी आग्रह

राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. बुधवारी, २४ डिसेंबरला सायंकाळी जळगाव एमआयडीसीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदेसेना या महायुतीतील दोन प्रमुख पक्षांची गोपनीय बैठक पार पडली. विशेष म्हणजे, महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार) बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते.
या बैठकीसाठी शिंदेसेनेकडून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते. तर भाजपकडून निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे, प्रभारी म्हणून आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता वाघ, माजी महापौर नितीन लढा, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती.
मागील निवडणुकीत ७५ पैकी ५७जागा जिंकून भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता काबीज केली होती. याच बलाबलानुसार यंदाही भाजपने शिंदेसेनेला कमी जागा देण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, शिंदेसेनाही सध्या सत्तेतील प्रबळ पक्ष असल्याने त्यांनी सन्मानजनक जागांसाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही आपली ताकद पाहता जागा वाटपात झुकते माप मागितले होते.
तातडीने युतीची घोषणा
नगरपालिका निकालांमुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिका निवडणुकीत असा कोणताही धोका पत्करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांची नाही. त्यामुळेच सावध पवित्रा घेत भाजप आणि शिंदेसेनेने बुधवारी तातडीने युतीची घोषणा केली. मात्र पहिल्या टप्प्यातील चर्चेत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला लांब ठेवल्याने महायुतीत 'सर्व काही आलबेल' नसल्याचेच दिसून येत आहे.
नेत्यांची झोप उडाली
तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर एकमत नसल्याने 'स्वबळा'चे नारे दिले जात होते. परंतु, नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी महायुतीच्या नेत्यांची झोप उडवली आहे. मुक्ताईनगर आणि भुसावळमध्ये भाजपच्या मंत्र्यांना, तर धरणगाव पालिकेत खुद्द पालकमंत्र्यांनाच पराभवाचे धक्के सहन करावे लागले आहेत.
राष्ट्रवादीचा २६ जागांचा प्रस्ताव
बैठकीनंतर आमदार मंगेश चव्हाण हे राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी त्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीने २६ जागांचा प्रस्ताव मंगेश चव्हाण यांच्यासमोर मांडला. त्यानंतर चव्हाण यांनी याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्याशी मोबाइलवर बोलणे करून दिले. या विषयावर गुरुवारी, तीनही पक्षांची बैठक होणार आहे.
महापालिका निवडणुकीत युतीच्या संदर्भात बैठक झाली. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाशी चर्चा करणे बाकी आहे. मात्र युती करणार हे आता निश्चित झालेले आहे. त्याची घोषणा आम्ही केली. जागा वाटपही जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीशी चर्चेनंतर तेही जाहीर केले जाईल. त्याला दोन, तीन दिवस लागतील- -मंगेश चव्हाण, आमदार तथा प्रभारी महापालिका निवडणूक
शिंदेसेना, भाजप यांची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली. आमची महायुती होईल. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाशी चर्चा करुन जागेची घोषणा केली जाईल. भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीशी चर्चा करतील. ही बैठक पूर्वनियोजित होती. -गुलाबराव पाटील, पालकमंत्री