तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:33 IST2025-12-28T13:33:20+5:302025-12-28T13:33:20+5:30
गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी मोठी खेळी

तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
जळगाव : जळगाव शहर आणि जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पक्षात उमेदवारीसाठी ६०० हून अधिक अर्ज आल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल आणि त्यांना पुढच्या काळात प्रमोशन दिले जाईल, असे सांगून मंत्री गिरीश महाजन यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी नाराज कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
जी. एम. फाऊंडेशन येथे आयोजित महानगरपालिका निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
खासदार स्मिता वाघ यांचे तिकीट एकदा कापले गेले होते, पण पाच वर्षांनी त्यांना पुन्हा संधी मिळाली आणि त्या खासदार झाल्या. ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल, असे सांगून गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
समोर प्रभावी कोणीही नाही
मागील निवडणुकीत भाजपने स्वबळावर ५७ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या युतीबद्दल बोलताना महाजन म्हणाले, समोर लढायला प्रभावी कोणीही उरलेले नाही, मग लढावे कोणासोबत? म्हणूनच आम्ही युती केली आहे. युतीमध्ये काही जागा सोडाव्या लागतात, पण कोणावरही अन्याय होणार नाही. जिथे आमचा उमेदवार कधी निवडून आला नाही, तिथे आम्ही प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेतले आहे, जेणेकरून भाजपची ताकद अधिक वाढेल.