जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:01 IST2025-12-31T11:34:57+5:302025-12-31T12:01:30+5:30
भाजप ४६, शिंदेसेना २३ तर राष्ट्रवादीला ६ जागा

जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. गेल्या अनेक दिवसांपासूनचा महायुतीचा तिढा अखेर मंगळवारी सुटला असून, जागावाटपाचे अधिकृत सूत्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यात विशेष बाब म्हणजे मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणारा भाजप यावेळी बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ७५ जागा लढवून ५७जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी युतीच्या धर्मामुळे भाजपला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. म्हणजेच, जिंकलेल्या जागांपेक्षाही ११ जागा कमी भाजप लढवत आहे. शिंदेसेना २३ तर राष्ट्रवादीला (अजित पवार) ६ जागा सोडण्यात आल्या आहेत.
युतीची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.
शेवटच्या दिवशी अर्जच अर्ज
जळगाव मनपासाठी २४ डिसेंबर रोजी २४ अर्ज तर सोमवारी २५० अर्ज आले होते, मात्र मंगळवारी हा आकडा ७६३ वर गेला. दुसरीकडे उमेदवारांनी समर्थकांच्या गर्दीत शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीने अधिकृत यादी जाहीर केली असली तरी, ज्यांचे पत्ते कट झाले आहेत अशा अनेक इच्छुकांनी अपक्ष किंवा इतर पक्षांकडून आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. जागावाटपात मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांचा वरचष्मा दिसून आला. भाजपमध्ये 'आयात' केलेल्या उमेदवारांना झुकते माप मिळाल्याने आणि जागावाटपात जागा कमी झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद आहे.
मविआत दोनच पक्ष
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धवसेना हे दोनच पक्ष सोबत आहेत. उद्धवसेना ३८ तर राष्ट्रवादी ३७जागा लढवीत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नाही. त्यांनी वंचितसह अन्य पक्षांना सोबत घेतले आहे. त्यात काँग्रेस स्वतः २५ जागा लढवीत आहे. तर अन्य जागा उर्वरित घटक पक्षांसाठी सोडल्या आहेत