विरोधकांच्या एकजूटची धास्ती, भाजप बॅकफूटवर; समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढण्याची आखली जातेय रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:03 IST2025-12-27T13:02:06+5:302025-12-27T13:03:28+5:30
राष्ट्रवादी व शिंदे सेनेला समाधानकारक जागा देण्याची तयारी

विरोधकांच्या एकजूटची धास्ती, भाजप बॅकफूटवर; समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढण्याची आखली जातेय रणनीती
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत हालचालींना वेग आला असून, विरोधकांच्या एकत्रित रणनीतीमुळे भाजप बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचे दिसून आले.
बैठकीत भाजपकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला पाच ते सहा जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र राष्ट्रवादीने ११ ते १३ जागांची ठाम मागणी केली. विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादीने ३५ ते ४० जागांचा प्रस्ताव ठेवला होता. आता त्यांनी मागणी कमी करत दोन पावले मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजप निरीक्षक आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून तब्बल २६ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर 'आम्ही विचार करतो,' असे आमदार चव्हाण यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ही निर्णायक बैठक झाली.
या बैठकीस भाजपकडून निरीक्षक आमदार मंगेश चव्हाण, निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला दूर ठेवले...
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला दूर ठेवून भाजप व शिंदे सेनेची स्वतंत्र बैठक झाली होती. त्यानंतर दोघं पक्षाच्या नेत्यांची भेट झाली व जागांविषयी चर्चा झाली, मात्र निर्णय झाला नव्हता.
भाजपची भूमिका बदलली, जागा वाढवून देणार?
सुरुवातीला शिंदे सेनेला १५ आणि राष्ट्रवादीला केवळ दोन ते तीन जागा देण्यावर ठाम असलेला भाजप आता भूमिका बदलताना दिसतो आहे. आजच्या घडीला भाजपने शिंदे सेनेला २५ जागा देण्याची तयारी दर्शवली असून, राष्ट्रवादीला सहा जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
विरोधकांची एकजूट, भाजपची धास्ती
भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना, दोन्ही राष्ट्रवादी गट, काँग्रेस तसेच अन्य समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. या संभाव्य आघाडीची धास्ती घेत भाजपला तडजोडीची भूमिका घ्यावी लागत असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. शनिवारी मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे येणार आहेत, तेव्हा जागा आणि प्रभागाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली.