आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अॅडजस्टमेंट'चे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:58 IST2026-01-05T15:57:33+5:302026-01-05T15:58:13+5:30
या पक्षात प्रवेश, त्या पक्षाचे तिकीट; स्वीकृतसह अन्य ठेक्यांची आश्वासने देऊन टाळली निवडणूक

आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अॅडजस्टमेंट'चे राजकारण
जळगाव - महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये रंगणार असे चित्र असताना, माघारीपर्यंत तरी जळगाव शहरातील अनेक जागा बिनविरोध करण्यावर भाजपा-शिंदेसेनेचा भर दिसून आला. तर काहींनी अनेक प्रभागांमध्ये गावकी-भावकी जपण्यास प्राधान्य दिले आहे.
काही दिग्गजांनी एकमेकांसमोर लढणे टाळत, मनपाचे राजकारण 'सेटलमेंट', 'अॅडजस्टमेंट' आणि मैत्रीपूर्ण लढती असेच केलेले दिसून येत आहे. मात्र या सर्व गदारोळात मतदारांना मात्र दुर्लक्षित केले आहे.
आमदारांनी लावली, कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?
या निवडणुकीत माजी महापौर, विद्यमान आमदारांनी आपल्या घरातील सदस्यांना व नातेवाइकांना आपापल्या पक्षाचे तिकीट देऊन राजकारणात लाँच केल्याचेही दिसून येत आहे. त्यात आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे व शालक डॉ. विश्वनाथ खडके यांचा समावेश आहे. आमदारांनी आपली ताकद वापरत या दोन्हीही उमेदवारांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा करून टाकला. चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पुत्र गौरव सोनवणे व पुतण्या सागर सोनवणे यांचा बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला.
माघारीसाठी आमिष...
मनपाची स्थापनेपासून कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एकही नगरसेवक बिनविरोध झालेला नसताना यंदा मात्र १२ नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. त्यासाठी काहींना स्वीकृत नगरसेवकांचे आश्वासनं दिली जात आहेत, तर काहींना मात्र मनपातून काही ठेक्यांचे आश्वासने दिली गेली आहेत.
प्रवेश या पक्षात, तिकीट मात्र दुसऱ्या पक्षाचे...
महाविकास आघाडी व महायुती होताना जागा वाटपाचे सूत्र जमवताना राजकीय पक्षांकडून ताळमेळ बसविताना काही गणिते फिस्कटल्यानंतर एकमेकांच्या उमेदवारांची आदान-प्रदानदेखील या निवडणुकीत होताना दिसून आली. प्रशांत नाईक यांनी महिन्याभरापूर्वी भाजपात प्रवेश केला, तिकीट मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घेतले. महाविकास आघाडीतही माजी नगरसेवक राजू पटेल हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते, तिकीट मात्र उद्धवसेनेचे घेतले.
२० जागांवर भाजप-उद्धव सेनेची हायव्होल्टेज लढत
मनपाच्या आखाड्यात सर्वाधिक २० लढती या भाजपा विरूद्ध उद्धवसेनेत रंगणार आहेत. महाविकास आघाडीकडून सर्वाधिक ३८हून अधिक जागा उद्धवसेना लढवत आहे. महायुतीत ४७ जागा भाजपा लढत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात मनपाच्या आखाड्यात सर्वाधिक लढती आहेत. त्याखालोखाल शिंदेसेना विरूद्ध उद्धव सेना ११ ठिकाणी लढती होणार आहेत. भाजपा विरूद्ध शरद पवार गटातही ११ ठिकाणी लढत होणार आहे.