जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:38 IST2026-01-01T12:38:10+5:302026-01-01T12:38:42+5:30
निवडणुकीचे काम असल्याने जराही हलगर्जीपणा चालणार नाही या इशाऱ्यामुळे अधिकारी प्रत्येक कागदपत्र दोनदा तपासून निर्णय घेत होते.

जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
जळगाव - महापालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत बुधवारी मोठ्या घडामोडी घडल्या. तांत्रिक चुका आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले आहेत. यात भाजपाच्या माजी महापौर जयश्री धांडे, उद्धवसेनेच्या डॉ. सुषमा चौधरी, नितीन जाधव यांचा समावेश आहे. तर प्रभाग १० 'ब' मध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनावर प्रचंड ताण होता. प्रत्येक अर्जाची तांत्रिक तपासणी, माहिती ऑनलाइन भरणे, प्रभागनिहाय याद्या तयार करणे यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक पहाटे २:३० वाजेपर्यंत काम करत होते. शेवटच्या दिवशी ७६३ तर अखेरपर्यंत एकूण अर्जाचा आकडा १०३८ वर पोहोचला. या अर्जाच्या डोंगरामुळे महापालिका प्रशासनाची पार तारांबळ उडाली आहे. निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे २:३० वाजेपर्यंत काम केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळी ९ वाजता पुन्हा छाननी प्रक्रियेसाठी ते सर्व हजर झाले.
प्रभाग ६ 'अ' मधून भाजपाच्या उमेदवार आणि माजी महापौर जयश्री अशोक धांडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या 'एबी' फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याचे छाननी दरम्यान समोर आले, त्यामुळे त्यांचा भाजपाचा अधिकृत अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. सुदैवाने, त्यांनी याच प्रभागात अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला होता, तो वैध ठरला आहे. त्यामुळे आता जयश्री धांडे या भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील.
एबी फॉर्मवरील स्वाक्षरीचा उद्धवसेनेलाही फटका
प्रभाग ३ क आणि ९ 'अ' मध्ये उद्धव सेनेच्या डॉ. सुषमा चौधरी आणि नितीन जाधव यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यांच्याही 'एबी' फॉर्मवर आवश्यक स्वाक्षरी नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरवला.
छाननी प्रक्रियेत आक्षेपांचा धुरळा
बुधवारी, ३१ डिसेंबरला सकाळी छाननीला सुरुवात होताच महापालिका परिसरात जणू राजकीय जत्राच भरली होती. अर्जातील तांत्रिक त्रुटींवरून उमेदवारांमध्ये एकमेकांवर तोंडी आणि लेखी आक्षेप घेण्याचे सत्र सुरू होते. आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील उमेदवारांच्या अर्जावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेत ठाण मांडले होते. निवडणुकीचे काम असल्याने जराही हलगर्जीपणा चालणार नाही या इशाऱ्यामुळे अधिकारी प्रत्येक कागदपत्र दोनदा तपासून निर्णय घेत होते.