भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

By विलास बारी | Published: April 3, 2024 12:03 PM2024-04-03T12:03:39+5:302024-04-03T12:04:21+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024:

BJP rejects ticket, riots at MP Uddhavsena's door, Jalgaon; Unmesh Patil's role will be hot | भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

- विलास बारी
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील व भाजपचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख करण पवार यांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्याची खेळी करीत, उद्धवसेनेने भाजपसमोरील डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे भाजपला आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रारंभी वाटली होती तेवढी सोपी राहिली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजप एकतर्फी विजय खेचून आणत आहे. 

तिकीट कापल्याने भाजपमध्ये नाराजी     
यावेळी भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. ती नेमकी हेरत उद्धवसेनेने या मतदारसंघात सक्षम पर्यायाचा शोध सुरू केला होता. 

गिरीश महाजन, मंगेश चव्हाण यांची डोकेदुखी वाढणार !
मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याची आणि त्यामुळे नाराजी वाढल्याची भाजपमधील अनेकांची भावना आहे. 
पाटील व पवार यांचा समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश झाल्यास भाजपच्या या दोन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे भाजपमधील खडसे समर्थक सक्रिय झाल्याची डोकेदुखी वेगळीच असेल.

समीकरण बदलणार
-खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांनी मंगळवारी खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. उभय नेते बुधवारी `मातोश्री’वर शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.
-नव्याने तयार होणाऱ्या या समीकरणामुळे लढतीचे चित्र बदलू शकते. उद्धवसेनेने स्वत: उन्मेष पाटील किंवा त्यांच्या अर्धांगिनी संपदा पाटील अथवा करण पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी लढत तेवढी सोपी राहणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.

Web Title: BJP rejects ticket, riots at MP Uddhavsena's door, Jalgaon; Unmesh Patil's role will be hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.