जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:00 PM2024-04-03T14:00:36+5:302024-04-03T14:02:34+5:30

Jalgaon Lok Sabha: उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

Big news Uddhav Thackeray announces candidate for Jalgaon Lok Sabha who is karan pawar | जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली असून चार नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये  कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर, हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामिड आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. जळगावचे विद्यमान भाजप खासदार यांनी आजच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही क्षणांतच उद्धव ठाकरेंनी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

भाजपने तिकीट वाटपात डावलल्यानंतर उन्मेष पाटील हे पक्षावर नाराज होते. जळगावात भाजपने पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जात शिवबंधन हाती बांधलं. पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र पाटील यांच्या सहमतीनेच उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत करण पवार?

करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पवार यांनी भाजपकडून एरंडोल विधानसभेसाठी तयारीही सुरू केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने पवार यांची उमेदवारी डावलली गेली. करण पवार हे पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिले असून त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.
 
शिवसेनेतील बंडानंतर जळगावातील बहुतांश नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले असले तरी, कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील व करण पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर चाळीसगाव, पारोळा व एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये उद्धवसेना मजबूत होणार आहे. शिवाय पाचोरा, भडगाव, तसेच जळगाव शहर व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन अजूनही चांगले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Big news Uddhav Thackeray announces candidate for Jalgaon Lok Sabha who is karan pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.