आता जालना महानगरपालिका बनली 'फॅमिली कॉर्पोरेशन', राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:30 IST2026-01-22T16:27:01+5:302026-01-22T16:30:03+5:30
अनेक ठिकाणी मतदारांनी परिचित नावांवर विश्वास दाखवला असून, घराणेशाहीचा राजकीय वारसा पुढे सुरू असल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.

आता जालना महानगरपालिका बनली 'फॅमिली कॉर्पोरेशन', राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांचा विजय
- राहुल वरशिळ
जालना : जालना महानगरपालिकेच्या शहर निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, या निवडणुकीत शहरातील विविध प्रभागांत राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांनी मोठे यश संपादन केले आहे. पत्नी, कन्या, आई-मुलगा, पती-पत्नी, वडील-मुलगा अशा नातेसंबंधातील उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत, नगरसेवक पदाचा मान पटकावला आहे.
मनपा निवडणुकीत आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना विजय झोल यांनी प्रभाग क्रमांक १६-क मधून शिवसेनेकडून विजय मिळविला. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-इ तर त्यांची पत्नी सुशीला दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-क मधून भाजपच्या वतीने निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने यश मिळविले. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची पत्नी संगीता गोरंट्याल (प्रभाग ६-अ) आणि मुलगा अक्षय गोरंट्याल (प्रभाग ५-अ) हे दोघेही भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. या आई-मुलानेही मतदारांचा विश्वास संपादन केला.
जालना शहर महापालिका निवडणुकीत महावीर ढक्का यांनी प्रभाग क्रमांक ९-क तर, त्यांचे पुत्र विक्रांत ढक्का यांनी प्रभाग क्रमांक २-ड मधून भाजपतर्फे निवडणुकीत यश संपादन केले आहे.
पाचफुले दाम्पत्य निवडणुकीत झाले पराभूत
अशोक पांगारकर यांनी प्रभाग १४ 'ब' मधून, तर त्यांच्या पत्नी उषा पांगारकर यांनी प्रभाग १६-ब मधून विजय संपादन केला, तर दुसरीकडे, शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या विष्णू पाचफुले (प्रभाग ९-क) आणि त्यांची पत्नी रंजिता पाचफुले (प्रभाग २-अ) यांना मात्र मतदारांनी नाकारल्याचे चित्र दिसून आले.
राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत नातेसंबंध आणि राजकीय दिग्गजांच्या कुटुंबातील उमेदवारांनी मिळविलेल्या यशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अनेक ठिकाणी मतदारांनी परिचित नावांवर विश्वास दाखवला असून, घराणेशाहीचा राजकीय वारसा पुढे सुरू असल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.
या मनपा निवडणुकीत एकाच कुटुंबातील आठ उमेदवारांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले असून, आता पती-पत्नी, आई-मुलगा आणि वडील-मुलगा पहिल्यांदाच महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहणार आहेत.