मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:21 IST2026-01-12T15:20:30+5:302026-01-12T15:21:05+5:30
पाच शहरांत ३९६ जागांसाठी २,५८४ उमेदवार मैदानात

मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
सोमनाथ खताळ/ जालना : मराठवाड्यातील सत्तेचे राजकारण सध्या 'हायव्होल्टेज' वळणावर आहे. आठपैकी पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, केवळ प्रचाराचा धुरळाच नाही तर पैशांचा महापूरही वाहताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी या पाच शहरांतील ३९६ जागांसाठी तब्बल २ हजार ५८४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेचा विचार केला, तरी या निवडणुकीत किमान २४९ कोटी ७४ लाख रुपयांची अधिकृत उधळपट्टी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकांचे वर्गीकरण आणि खर्चाचे गणित
निवडणूक आयोगाने महापालिकांच्या वर्गवारीनुसार खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ही एकमेव 'क' वर्ग महापालिका असून, तेथील उमेदवाराला ११ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. उर्वरित जालना, लातूर, नांदेड आणि परभणी या 'ड' वर्ग महापालिका असून येथे ९ लाख रुपयांची मर्यादा आहे. अर्ज भरल्यापासून ते निकालापर्यंतचा हा हिशोब कोट्यवधींच्या घरात जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक चुरस
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८५९ उमेदवार मैदानात आहेत. येथील ११५ जागांसाठी होणारा खर्च ९४ कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेतही पहिल्याच निवडणुकीत ४० कोटींहून अधिक रुपयांची अधिकृत उधळपट्टी अपेक्षित आहे.
आयोगाची नजर, तरीही छुप्या खर्चाचा जोर
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू असून, आतापर्यंत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयोगाच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त 'अघोषित' खर्च निवडणुकीत होतो, हे उघड गुपित आहे. अधिकृत खर्चाचा हिशोब लावला, तर २४९ कोटींचा होत आहे. परंतु, 'इतर' खर्चाचे गणित लावले तर तो दुप्पट, तिप्पट वाढू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
अशी आहे खर्च मर्यादा
वर्ग - खर्च मर्यादा
अ वर्ग - १५ लाखब वर्ग - १३ लाख
क वर्ग - ११ लाख
ड वर्ग - ९ लाख
अशी आहे आकडेवारी
महापालिका - प्रभाग - सदस्य - उमेदवार - रक्कम
छत्रपती संभाजीनगर - २० - ११५ - ८५९ - ९४ कोटी ४९ लाख
जालना - १६ - ६५ - ४५४ - ४० कोटी ८६ लाख
लातूर - १८ - ७० - ३६९ - ३३ कोटी २१ लाख
नांदेड - २० - ८१ - ४९१ - ४४ कोटी १९ लाख
परभणी - १६ - ६५ - ४११ - ३६ कोटी ९९ लाख
एकूण - ९० - ३९६ - २५८४ - २४९ कोटी ७४ लाख