नात्यांचे 'इलेक्शन'; आई-मुलगा अन् पती-पत्नीची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:57 IST2026-01-06T15:55:11+5:302026-01-06T15:57:23+5:30
जालना मनपा निवडणूक कौटुंबिक राजकारणामुळे चर्चेत

नात्यांचे 'इलेक्शन'; आई-मुलगा अन् पती-पत्नीची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
जालना : जालना निवडणुकीसाठी १६ प्रभागांतून ४५३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल महानगरपालिकेच्या केले आहेत. यामध्ये शहरातील विविध प्रभागांत राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांनीदेखील निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात पत्नी, कन्या, आई-मुलगा, पती-पत्नी, वडील-मुलगा एकाच वेळी नशीब आजमावत असल्याने यंदाची मनपा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
या मनपा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना विजय झोल यांनी प्रभाग क्रमांक १६-क मधून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या राजकीय भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-३ तर, त्यांच्या पत्नी सुशीला दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-क मधून भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कुटुंबातून त्यांची पत्नी संगीता गोरंट्याल या प्रभाग क्रमांक ६-अ तर, मुलगा अक्षय गोरंट्याल प्रभाग क्रमांक ५-अ या वेगवेगळ्या प्रभागांतून आई-मुलगा दोघेही भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एका कुटुंबातील दोन उमेदवार दिल्यामुळे ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे. महावीर ढक्का यांनी प्रभाग क्रमांक ९-क तर, त्यांचे पुत्र विक्रांत ढक्का यांनी प्रभाग क्रमांक ९-ड मधून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वारसा पुढे नेण्याची तयारी दर्शवली आहे.
याशिवाय विष्णू पाचफुले यांनी प्रभाग क्रमांक ९-क तर, त्यांची पत्नी रंजिता पाचफुले प्रभाग क्रमांक ९-अ मधून हे पती-पत्नी दोघेही शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकाच कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील उमेदवारांमुळे मनपा निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. एका कुटुंबातील दोन-दोन सदस्य विविध पक्षाकडून उमेदारी मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. असे असले तरी मतदारांचा कौल त्यांना मिळतो का हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
मनपा निवडणूक कौटुंबिक राजकारणामुळे चर्चेत
या सर्व उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि मतदारांच्या प्रतिसादाकडे राजकीय पक्षांसह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. प्रस्थापित नेत्यांचा प्रभाव मतपेटीत किती उतरतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी जालना मनपा निवडणूक कौटुंबिक राजकारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या घराणेशाहीमुळे पक्षाचा एबी फार्म मिळाला नसल्यामुळे अनेकांनी दुसऱ्या पक्षाचा पर्याय निवडला तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.