तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:03 IST2026-01-06T16:02:06+5:302026-01-06T16:03:43+5:30
'विधानपरिषदेत बिनविरोध निवडून येण्यासाठी कोणाकोणाला किती पैसे दिले, याचा खुलासा करावा.'

तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
विजय मुंडे/ जालना: भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर आर्थिक व्यवहार झाला, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. मग उद्धव ठाकरे यांनीही विधानपरिषदेत बिनविरोध निवडून येण्यासाठी कोणाकोणाला किती पैसे दिले, याचा खुलासा करावा, असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पक्षाने मला सरपंच ते केंद्रीय मंत्री केले. तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात आणि अडीच वर्षांत परत आलात. त्यामुळे कोण मोठे याचा विचार करा, असेही दानवे म्हणाले.
जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या विकास कामांची आणि जालना जिल्ह्याला दिलेल्या निधीची माहिती देत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. भाजपच्या ताब्यता मनपा द्या शहराच्या गरजा पूर्ण करू. ७५ वर्षाचा बेंगलॉग भरून काढू, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.
जालन्याला क्रीडा विद्यापीठ द्या : गोरंट्याल
जालन्यातील मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजना, सौरऊर्जा प्रकल्पासह इतर योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला आहे. जालन्याला आता क्रीडा विद्यापिठाची मंजुरी द्यावी, अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केली.
'शहराचा कायापालट करू'
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जालन्यात अनेक विकास कामे केली आहेत. यापुढेही जालना शहराच्या विकासाची गत कायम राहण्यासाठी आणि शहराचा कायापालट करण्यासाठी मतदारांनी भाजपच्या पाठीशी रहावे, असे आवाहन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगराध्यक्ष भास्कर दानवे, घनसावंगीचे नेते सतीश घाडगे, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल लोणीकर, राजेश राऊत, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल उपस्थित होते. बबनराव लोणीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.