महायुतीत फूट, मित्रपक्ष आमने-सामने; महाविकास आघाडीची मोट कायम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:17 IST2025-12-31T12:15:51+5:302025-12-31T12:17:35+5:30
जालना महानगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या घड्याळासोबत धावणार 'इंजिन'

महायुतीत फूट, मित्रपक्ष आमने-सामने; महाविकास आघाडीची मोट कायम !
जालना : महानगरपालिकेची निवडणूक महायुतीतील मित्रपक्षांनी एकत्रित लढावी, यासाठी मित्रपक्षांच्या नेत्यांत सुरु असलेल्या मॅरेथॉन बैठकांतील चर्चा अखेर मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निष्फळ ठरली. महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष आता एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) ने मनसेला सोबत घेत युती केली आहे. तर मविआची मोट कायम असून, कॉंग्रेस पक्ष मविआत मोठ्या भावाच्या भूमिकेत निवडणूक आखाड्यात उत्तरला आहे.
आलना महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक महायुतीतील मित्रपक्षांनी एकत्रित लढावी, यासाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्वाल, भास्कर दानवे, अरविंद चव्हाण यांच्यात आठ दिवसांपासून सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे.
बैठकांमधून डावलले, योग्य सन्मानही दिला नाही: चव्हाण
महायुतीच्या बैठकांतून डावलणे आणि मागणीनुसार जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी सोमवारीच स्वबळाचा नारा दिला होता. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांची शिंदेसेनेच्या पक्ष कार्यालयात बैठक झाली आणि ती शेवटची बैठवाही निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) कडून स्वतंत्र उमेदवार उभा करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) ने मनसेला सोबत घेतले आहे. हे दोन पक्ष सोबत आल्याने निवडणुकीच्या निकालावर कसा परिणाम होतो? याकडेही विरोधकांसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
९६२ उमेदवारांचे अर्ज
प्रभाग क्रमांक १३, १४, १५, १६ वगळता इत्तर प्रभागांतून तब्बल २६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी पाच यांचे काम रात्री १० नंतरही सुरू होते. त्यामुळे या प्रभागातून नेमके किती उमेदवारांचे अर्ज दाखल झाले, याची आकडेवारी मिळू शकली नाहीं. सर्वच १६ प्रभागांतून अंदाजे १४०० वर अर्ज दाखल असल्याचे सांगण्यात येते.
भाजपचे सर्वच ६५ उमेदवार
भाजपच्यावतीने महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच १६ प्रभागांतून ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरविण्यात आले आहेत. शिंदेसेनेकडून ६२ उमेदवारांचाच एबी फॉर्म निवडणूक विभागाकडे जमा होऊ शकला, त्यामुळे तीन उमेदवारांना पुरस्कृत केले जाणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) ने ५० उमेदवार तर मनसेने ६ उमेदवार उभे केले आहेत. इतर १० उमेदवारांना पुरस्कृत केले जाणार आहे. मविआमध्ये काँग्रेसकडून ३९ 5 आणि उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रत्येकी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहेत.
वंचित, एमआयएमही निवडणूक आखाड्यात
महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २३ उमेदवार उभा केले आहेत. तर एमआयएमक्कडून जवळपास २० उमेदवार उभा करण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील उमेदवार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत. त्याशिवाय बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळेही निवडणूक निकालावर परिणाम होणार आहे.
बंडखोरांसह अपक्षांचाही भरणा
प्रमुख पक्षाकडून उमेदवारी डावलल्याने अनेकांनी बंडाचे निशाण हाती घेत उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवाय अपक्षांचाही भरणा अधिक आहे. त्यामुळे बंडखोरी शमिवण्यासह अधिकाधिक अपक्षांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींना अधिक जोर लावावा लागणार आहे. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.