युतीला विलंब, 'अर्जुना'चा नवा 'बाण'! इच्छुकांच्या मुलाखती झाल्या तरी भाजपकडून प्रतिसाद नसल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:00 IST2025-12-25T11:59:15+5:302025-12-25T12:00:33+5:30
जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गत दोन दिवसांत १,४९६ अर्जाची विक्री झाली आहे.

युतीला विलंब, 'अर्जुना'चा नवा 'बाण'! इच्छुकांच्या मुलाखती झाल्या तरी भाजपकडून प्रतिसाद नसल्याची खंत
विजय मुंडे/ जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेण्यावर भाजपकडून विलंब होत आहे. त्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांनी नवा 'बाण' सोडत वेगळी चूल मांडण्याची तयारी करीत असल्याचे संकेत दिले आहेत. महायुतीसाठी आ. खोतकर हे दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. यासाठी गत आठवड्यात बैठक झाली होती. इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर निर्णय घेऊ, असे भाजपकडून सांगण्यात आले. परंतु, भाजपचा पुढील निर्णय आलेला नाही.
'राष्ट्रवादी' म्हणते आम्ही शिंदेसेनेसोबत
एकीकडे भाजपकडून युती, महायुतीबाबत हालचाली गतिमान दिसत नाहीत. त्यात दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी शिदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.
आपण शहर विकास आघाडी करू
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले असून, ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. सुट्यांचा कालावधी वगळता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता ४ दिवस राहिले आहेत. भाजपकडून युतीच्या निर्णयास विलंब होत आहे. त्यात इतर पक्षाच्या नेतेमंडळींनी 'आपण शहर विकास आघाडी करू', अशी साद आ. खोतकर यांना घातली आहे. त्यामुळे भाजपने युतीचा निर्णय न घेतल्यास खोतकर इतर पक्षांची मोट बांधून वेगळी चूल मांडण्याची तयारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.