जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 22:50 IST2025-10-16T22:49:10+5:302025-10-16T22:50:14+5:30
Jalna Municipal Commissioner Santosh Khandekar Arrested: कंत्राटदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक केली.

जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
जालना शहरात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली. जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. पालिका प्रमुखावरच ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एका कंत्राटदाराच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात आयुक्त संतोष खांडेकर यांनी कंत्राटदाराकडे १० लाख रुपयांची मागणी केली. कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि आयुक्तांना १० लाख रुपयांची लाच घेताना त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सध्या आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. या झडतीमध्ये आणखी कोणती माहिती किंवा कागदपत्रे हाती लागतात, याकडे जालना शहरासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे जालना महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.