जालना मनपासाठी 'ऐतिहासिक' मतदान! पहिल्या कारभाऱ्यांच्या निवडीला मतदारांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:24 IST2026-01-15T12:24:27+5:302026-01-15T12:24:53+5:30
शहराचा पहिला 'महा'कारभारी निवडण्यासाठी जालनाकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे.

जालना मनपासाठी 'ऐतिहासिक' मतदान! पहिल्या कारभाऱ्यांच्या निवडीला मतदारांच्या रांगा
जालना: जालना शहराच्या राजकीय इतिहासात आज १५ जानेवारी रोजी नवा अध्याय लिहिला जात आहे. जालना महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहराचा पहिला 'महा'कारभारी निवडण्यासाठी जालनाकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे.
राजकीय समीकरणे आणि मोठी चुरस
महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, तब्बल ४५४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राजकीय गणिते पाहिली तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसे यांची युती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या बहुकोणीय लढतीमुळे प्रत्येक प्रभागात चुरस वाढली आहे.
प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी २९१ मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः शहरात फिरून मतदान केंद्रांचा आढावा घेत आहेत. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग संथ असला तरी, ९ वाजेनंतर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा केंद्राबाहेर पाहायला मिळाल्या. पहिल्यांदाच 'महानगरपालिका' म्हणून मतदान करत असल्याचा आनंद मतदारांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.