पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 20:37 IST2024-11-23T20:36:31+5:302024-11-23T20:37:17+5:30
चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली.

पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'
जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघात शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच वेळा आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांचा पराभव केला. २ हजार ३०९ मतांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवत उढाण 'जायंट किलर' ठरले आहेत.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार आखाड्यात होते. यात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे, भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शिवाजी चोथे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कावेरी खटके हे प्रमुख उमेदवार होते.
चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली. राजेश टोपे यांना ९६ हजार १८७ मते मिळाली, अपक्ष उमेदवार सतीश घाडगे यांना २३ हजार ६९६ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके यांना २० हजार ७३१ मते मिळाली. उढाण यांनी २ हजार ३०९ पेक्षा अधिक मते घेत टोपे यांचा पराभव केला.