बाराशे बॅलेट मशीनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:54 IST2019-04-12T23:53:13+5:302019-04-12T23:54:10+5:30
जालना लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे.

बाराशे बॅलेट मशीनचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. लोकसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिटची गरज पडणार आहे. ही बाब लक्षात घेता, एक हजार २०० बॅलेट युनिट या बुलडाणा येथून मागवल्या असून, त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जालना लोकसभा मतदार संघात यंदा १६ पेक्षा कमी उमेदवार राहीतील असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने जालना लोकसभा मतदार संघात अतिरिक्त एक बॅलेट युनिट आणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या अतिरिक्त बॅलेट युनिट बुलडाणा येथून आणण्यात आल्या असून, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभेसाठी ८०० बॅलेट युनिट पाठवण्यात आल्या असून, जालना, भोकरदन आणि बदनापूरसाठी ४०० बॅलेट युनिट दाखल झाल्या आहेत.
आचारसंहिता भंगाचे गुन्हे
जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा दिवसांमध्ये आठ आचार संहिता भंगाचे गुन्हे दासखल करण्यात आले आहेत. त्यात विशेष करून बॅनर लावण्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. एकूणच घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे एका गाडीत ८५ लाख रूपये रोख सापडले होते. त्याचा खुलासा प्राप्तीकर विभागाकडून मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांचे प्रशिक्षण
जालना विधानसभे अंतर्गत निवडणूक विभागात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सेंट मेरी हायस्कूलमध्ये पार पडले. पहिल्या दिवशी ५ कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची उत्तरे संयुक्तिक वाटल्यास त्यांना मुभा दिली जाईल, नसता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता काळात ११ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एकूण ८३ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यात ४८ वारस व ३५ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ४९ आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आले आहे. तसेच हातभट्टी ६४७ लिटर रसायन ९८९६ लिटर देशी ३३१.८६ ब. लिटर विदेशी २३.८ लिटर आणि ११ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच १० लाख ६९ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.