काँग्रेसची सद्दी संपली, जालना महापालिकेत भाजप स्वबळावर झाला बलाढ्य सत्ताधारी पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:27 IST2026-01-17T16:27:32+5:302026-01-17T16:27:59+5:30
जालना महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर यंदा पहिली निवडणूक झाली.

काँग्रेसची सद्दी संपली, जालना महापालिकेत भाजप स्वबळावर झाला बलाढ्य सत्ताधारी पक्ष
- दिनेश लिंबेकर
जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत ६३ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात बलाढ्य पक्ष ठरला असून, सत्तेचे स्पष्ट बहुमत पक्षाकडे आले आहे. दुसरीकडे शिंदेसेनेला ६१ पैकी १२, तर काँग्रेसला ४३ पैकी ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राजकीय पक्षाच्या सत्तेचे गणित बिघडवण्याच्या तयारीत असलेल्या १५२ पैकी १५१ अपक्षांना सपाटून मार खावा लागला असून, केवळ एका अपक्षाने विजय मिळवत नाक राखले आहे.
जालना महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर यंदा पहिली निवडणूक झाली. सत्तेच्या समीकरणात विधानसभेच्या पराजयानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केल्याने भाजपला पालिकेच्या राजकारणात कणखर नेता मिळाला. भाजपने या निवडणुकीत त्यांना बळ देत ६३ ठिकाणी पक्षाचे उमदेवार निवडणूक रिंगणात उतरवले. प्रचारासाठी रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, नारायण कुचे यांनी जोर लावल्याने भाजपला विजयश्री खेचून आणता आला. राज्यात भाजप व शिंदेसेना मित्रपक्ष असले, तरी या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेना असाच सामना पाहायला मिळाला. शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी या निवडणुकीत ६१ जागेवर उमेदवार उभे करत त्यांचा प्रचार केला, परंतु शिंदेसेनेला केवळ १२ जागांवर विजय मिळवता आला आहे. २०१६ च्या तुलनेत या निवडणुकीत शिंदेसेनेला - त्या काळची शिवसेना फक्त एक जागा जास्तीची मिळवता आली आहे. काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत करत ४३ ठिकाणी उमेदवार उभे केले, परंतु पक्षाला ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने गड राखण्यासाठी आमदार राजेश राठोड, खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची धोबीपछाड
जालना नगरपालिका अस्तित्वात असताना, २०१६ मध्ये ९ जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची यंदाच्या महानगर पालिकेत चांगलीच धोबीपछाड झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)ने १३, तर राष्ट्रवादी (अजित पवार)ने ४० जागा, अशा एकूण ५३ ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने उमेदवार उभा करूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.
काँग्रेसलाही गड राखण्यात अपयश आले
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत २८ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला महानगरपालिका निवडणुकीत चांगलाच दणका बसला आहे. या निवडणुकीत पक्षाने ४३ ठिकाणी उमदेवार उभा केले खरे, परंतु केवळ ९ ठिकाणी उमेदवार विजयी होऊ शकले आहेत. दुसरीकडे एमआयएम पक्षाला १७ पैकी केवळ दोन ठिकाणी, तर ठाकरे सेना, बसपा, मनसे, रिपब्लिकन बहुजन सेना, अ. भा. सेना, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पार्टी, रासप, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांना एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.