२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर
By विजय मुंडे | Updated: April 30, 2024 16:55 IST2024-04-30T16:53:20+5:302024-04-30T16:55:42+5:30
२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती.

२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर
जालना : लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत केवळ ८४८२ मतांनी पराभूत झालेल्या डॉ. कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. २००९ च्या निवडणुकीत काळे यांना केवळ जालना आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले होते. इतर चार विधानसभा मतदारसंघांत दानवे यांना मताधिक्य होते. त्यामुळे मविआला जालना, सिल्लोडसह इतर चार मतदारसंघांत अधिकचा जोर लावावा लागणार आहे.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच दानवे आणि काळे यांनी मतदारसंघात बैठका, सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा सुरू असली तरी मतदार यंदा कोणाला संधी देणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
वंचित, बसपाही वाढविणार ‘बीपी’
यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले, बसपाकडून निवृत्ती बनसाेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय इतर पक्षांचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी जोर लावला आहे. वंचित, बसपासह अपक्ष उमेदवारांमुळे मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा ‘बीपी’ वाढण्याची चिन्हे आहेत.
२००९ मध्ये विधानसभा
मतदारसंघनिहाय पडलेली मते
रावसाहेब दानवे - कल्याण काळे
जालना - ३८,१६६ - ५३,१६३
बदनापूर - ६५,३५८ - ५९,२९०
भोकरदन - ६७,१२३- ६२,९६९
सिल्लोड - ५७,४६१ - ५९,२९९
फुलंब्री - ६६,४५२ - ५२,८३४
पैठण - ५६,०९५ - ५४,६४८
पोस्टल - ५५ - २५