आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क
By रमेश वाबळे | Updated: April 26, 2024 15:29 IST2024-04-26T15:27:32+5:302024-04-26T15:29:18+5:30
विवाह आणि मतदानाचा मुहूर्त एकाच दिवशी आला आहे

आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क
हिंगोली : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार नाही, याची काळजी प्रत्येक मतदाराने घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले. या आवाहनाला साद देत सेनगाव तालुक्यातील उटी (ब्रम्हचारी) येथे नवरदेवाने बोहल्यावर चढण्याअगोदर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
सेनगाव तालुक्यातील उडी (ब्रम्हचारी) येथील गोपाल पोहकर यांचा विवाह हिंगोली तालुक्यातील आमला येथील मुलीशी २६ एप्रिल रोजी ठरला. विवाह आणि मतदानाचा मुहूर्त एकाच दिवशी आल्याने नवरदेव गोपाल पोहकर यांनी लग्नाकरीता आमला येथे निघण्याअगोदर उटी येथील मतदान केंद्र क्रमांक ६४ वर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव मतदानासाठी आल्याचे पाहून मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी स्वागत केले.
दरम्यान, लोकशाहीला बटकट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून, ते आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मत गोपाल पोहकर यांनी व्यक्त केले.