नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू; जमाकुडो-कोपालगड नाल्यावरील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: July 24, 2025 14:27 IST2025-07-24T14:25:52+5:302025-07-24T14:27:56+5:30

Gondia : मित्राच्या घरुन जेवण करुन परततांना घडली घटना

Youth dies after being swept away in floodwaters of drain; Incident on Jamakudo-Kopalgad drain | नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू; जमाकुडो-कोपालगड नाल्यावरील घटना

Youth dies after being swept away in floodwaters of drain; Incident on Jamakudo-Kopalgad drain

सालेकसा (गोंदिया) : तालुक्यातील जमाकुडो-कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात युवक वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ जुलै रोजी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. टिकेश शंकरलाल मडावी (४५) रा. जमाकुडो असे पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. माजी जि.प.सदस्य व आदिवासी सेवक शंकरलाल मडावी यांचा तो मुलगा होय.

बुधवारी (दि.२३) सायंकाळी सालेकसा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला होता. तालुक्यातील जमाकुडो येथील टिकेश मडावी हा सायंकाळी कोपालगड येथील त्याचा मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर पाऊस सुरुच असल्याने तो मित्राच्या घरीच काही वेळ थांबला होता. यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. तेव्हा तो आपल्या स्कुटीने घरी जमाकुडो येथे परत येण्यासाठी निघाला. याच मार्गावरील कोपालगड-तेलीटोला (जमाकुडो) दरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना टिकेशने वाहत्या पाण्यातून स्कुटी काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो स्कुटीसह नाल्याच्या पुरात वाहून गेला. तिकडे रात्री उशिरापर्यंत टिकेश घरी पोहचला नाही म्हणून टिकेशच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्राच्या घरी कोपालगड येथे फोन केला. तेव्हा त्यांने एक तासापुर्वीच टिकेश घरी जाण्यासाठी निघाल्याचे सांगितले. तेव्हा टिकेशचे वडील शंकरलाल मडावी हे कुटुंबातील काही लोकांना घेवून त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावर जमाकुडो-कोपालगड पुलापासून दोन किमी अंतरावर टिकेशचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी (दि.२४) सालेकसा येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द केला.

गोंदिया येथील एसएस गर्ल्स महाविद्यालयात लिपीक म्हणून होता कार्यरत

टिकेश मडावी हा गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित एस.एस.गर्ल्स महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्चात वडील,आई, पत्नी व दोन मुल असा आप्त परिवार आहे. टिकेशच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Web Title: Youth dies after being swept away in floodwaters of drain; Incident on Jamakudo-Kopalgad drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.