भरधाव टिप्परची प्लेझरला धडक, शिक्षिका जागीच ठार
By अंकुश गुंडावार | Updated: May 26, 2023 13:35 IST2023-05-26T13:32:27+5:302023-05-26T13:35:26+5:30
तिरोडा शहरातील घटना : सरांडी आश्रम शाळेत होत्या कार्यरत

भरधाव टिप्परची प्लेझरला धडक, शिक्षिका जागीच ठार
तिरोडा (गोंदिया) : भरधाव टिप्पर प्लेझरला दिलेल्या धडकेत प्लेझरस्वार शिक्षकेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास शहरातील शहीद मिश्रा विद्यालय जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर घडली. योगिनी प्रभूदास कुंभलकर (५२) रा. तिरोडा असे अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार शिक्षिका योगिनी कुंभलकर या त्यांच्या प्लेझर गाडी क्रमांक एमएच ३५, आर ६११८ ने शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास संराडी येथे शाळेत जाण्यासाठी जात होत्या. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ३५, एजे १०३३ ने त्यांच्या प्लेझर गाडीला शहरातील शहीद मिश्रा विद्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत शिक्षिका योगिनी कुंभलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. योगिनी कुंभलकर या शहीद मिश्रा वॉर्ड येथील रहिवासी असून त्या तिराेडा तालुक्यातीलच सरांडी खासगी प्रगती आश्रम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास त्या आपल्या प्लेझर दुचाकी शाळेत जाण्यासाठी निघाल्या असता टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचीे नोंद तिरोडा पाेलिसांनी घेतली असून घटनेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. मृतक शिक्षिकेच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा आहे.