कुणाचे तिकीट कापणार, कुणाला मिळणार पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:26 IST2024-09-20T15:25:18+5:302024-09-20T15:26:08+5:30
चर्चांनी तापले राजकीय वातावरण : विद्यमानांसह इच्छुकांची वाढली धाकधूक

Whose ticket will be cut, who will get another chance
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे जिल्ह्यातील मतदारसंघातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कुणाचे तिकीट कापणार आणि पुन्हा कुणाला संधी मिळणार, या चर्चांनी सध्या गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव हे चार मतदारसंघ आहेत. यापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष, तिरोडा मतदारसंघावर भाजप, आमगाव काँग्रेस आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे उमेदवारी देताना काही मतदारसंघांत बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेससह, उद्धवसेनेने सुद्धा दावा केला आहे, तर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या काँग्रेसच्या महामेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघ लढविणार असल्याचे सांगत मित्र पक्षांची हवा टाइट केली होती, तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाच्या पक्ष निरीक्षकांसमोर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी चार मतदारसंघांतून उमेदवार देण्याची मागणी केली. काहीही झाले तरी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून भाजपाच उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला होता. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे, हे विशेष.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केल्याने या मतदारसंघातून भाजपाचा चेहरा कोण, याची चर्चा आहे, तर गेल्या निवडणुकीत भाजपाला रामराम करून अपक्ष निवडून आलेले विद्यमान आ. विनोद अग्रवाल हे आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, तर तिरोड्यात भाजपकडून विद्यमान आ. विजय रहांगडाले हेच निवडणूक रिंगणात राहणार आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. सहषराम कोरोटे हे पुन्हा रिंगणात राहणार असून भाजपा त्यांच्याविरुद्ध जुनाच चेहरा देते की नवीन तगडा उमेदवार देते, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील नेते बैठकांमध्ये व्यस्त
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीला घेऊन नागपूर येथे गेल्या दोन- तीन दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका सुरू आहेत. या बैठकींमध्ये गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे काही वरिष्ठ नेतेसुद्धा व्यस्त असल्याची माहिती आहे, तर २३ तारखेपूर्वी गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे.
जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याने वाढविली धाकधूक
महायुती आणि महाविकास आघा- डीकडून काही जागांवर तह होऊन उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना वेग आला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत सुद्धा बदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे काहींची धाकधूक वाढली असून त्यांनी आपल्या विश्वासू नेत्यांच्या गाठीभेटीचे सत्र वाढविल्याचे चित्र आहे.