२१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:08 IST2025-06-27T20:01:56+5:302025-06-27T20:08:00+5:30

भौतिक सुविधांचा अभाव : कुणीच दखल घेईना

Who is the guardian of 21 schools and 14 anganwadis? Education tax levied but facilities ignored | २१ शाळा, १४ अंगणवाड्यांचा वाली कोण? शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

Who is the guardian of 21 schools and 14 anganwadis? Education tax levied but facilities ignored

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा :
सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर सालेकसा व आमगाव-खुर्द परिसरातील एकूण सात प्राथमिक शाळा आणि १४ अंगणवाड्यांना जि.प. तर्फे भौतिक सोयी सुविधांसाठी आवश्यक साहित्य व अनुदान मिळणे बंद झाले. ग्रामपंचायतकडून मिळणारी मदत बंद झाल्याने व नगरपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा कोणतेही अनुदान मिळत नसल्याने प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे २१ शाळा आणि १४ अंगणवाड्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


सालेकसा नगरपंचायतच्या हद्दीत शहरासह ग्रामीण भागाचा सुद्धा समावेश आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नगरपंचायतच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. या भागात शाळा, अंगणवाडी असल्या तरी त्याकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. नगरपंचायत क्षेत्रात १४ अंगणवाड्या आणि सात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. या शाळांना विकासकामांसाठी किंवा रंगरंगोटी व इतर सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत पुरविल्या जातात. पण नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने या शाळांना या सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात जि.प. व पं.स. कडे विचारणा केली तर नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याचे सांगून मोकळे होतो. नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा केला तर या शाळा, अंगणवाड्या जि.प.ने आमच्या सुपूर्द केल्या नसल्याने काहीच करता येत नसल्याचे सांगतात. या वादात विद्यार्थ्यांना मात्र शैक्षणिक सोयी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.


शिक्षण कराची आकारणी पण सुविधांकडे दुर्लक्ष

  • नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून विविध कर आकारणी केली जाते. यात शिक्षण कर सुद्धा घेतले जाते. मात्र शिक्षणासाठी सोयी सुविधा पुरविल्या जात नाही.
  • मग शिक्षण कर कसला, असा २ सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच नगरपंचायत क्षेत्रातील १४ अंगणवाड्या आणि ७ जि.प. शाळांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


या शाळांचा आहे समावेश
नगरपंचायतीमध्ये ज्या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे, त्यात मराठी वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमगाव खुर्द, हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा सालेकसा, वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला, वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभळी, वरिष्ठ प्राथमिक शाळा बाकलसर्रा, प्राथमिक शाळा मुरुमटोला, प्राथमिक शाळा सालेकसा (जुना) या सर्व सात शाळांचा समावेश आहे. तसेच १४ अंगणवाड्यांचा समावेश आहे.


"ग्रामपंचायत असताना सरपंच सचिवांच्या माध्यमातून शाळेला अनेक भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. पण नगरपंचायत झाल्यापासून कुठल्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. नगरपंचायतचे अधिकारी शाळा अद्याप हस्तांतरित झाल्या नसल्याचे सांगतात."
- वाय.डी. अंबादे, मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा हलबीटोला,


"शाळा नगरपंचायतमध्ये असल्या तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शालेय पोषण आहार, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या, पाठ्यपुस्तके आणि सुविधा दिल्या जातात."
- प्रदीप शरणागत, गटसमन्वयक गटसाधन केंद्र सालेकसा.

Web Title: Who is the guardian of 21 schools and 14 anganwadis? Education tax levied but facilities ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.